टोलनाक्यावर लागू असलेला टोल नाकारत तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तोडफोड  आणि मारहाण केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी अटक केलेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या तीन इतर सहकाऱयांचाही जामीन मंजूर केला आहे.
सिंधुदुर्ग-गोवा मार्गावरील पेडणे तालुक्यातील धारगळ येथे ही घटना घडली होती.
नीतेश राणे व त्यांचे सहकारी पेडणेच्या दिशेने जात होते. त्यावेळी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या हद्दीवर असलेल्या पेडणे तालुक्यातील धारगळ येथे टोलनाका आहे. या ठिकाणी टोल भरण्यावरून नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांचा टोल कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान टोलनाक्याच्या तोडफोडीत झाले. त्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आधी राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले व नतंर अटक केली. पुढील तपास सुरू आहे. नीतेश यांच्या अटकेचे वृत्त समजताच पेडणे तालुक्यातील संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाही दिल्याचे समजते. नीतेश यांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. याआधीही नीतेश अनेकदा वादात अडकले आहेत. स्वाभिमान संघटनेचाच कार्यकर्ता असलेल्या चिंटू शेखवर गोळीबार केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखलकेला होता. ‘झेंडा’ चित्रपटात नारायण राणे यांचे विडंबन करण्यात आल्याचा आरोप करून त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनाही धमकावले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा