सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जलसंधारण कामांना मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावातून सुरुवात केली आहे. चेन्नईच्या एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम राबविला जात आहे.डोंगरगाव येथील साठवण तलावाच्या खोदाईच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे आणि एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार शिंदे वकील, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे आदींच्या उपस्थितीत झाला.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, की मंगळवेढा तालुक्याच्या २४ दुष्काळी गावांतील सर्व जलसंधारण कामाला येत्या ५ मार्चपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढ्यासह मोहोळ, अक्कलकोट तालुक्यात जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्यानंतर तेथील सर्व गावे दुष्काळमुक्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चेन्नईच्या एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशन ऑफ इंडिया संस्थेकडून देशातील विविध १८ राज्यांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू आहेत. संस्थेला कामाचा चांगला अनुभव असल्याची प्रशस्तीही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली.मंगळवेढा तालुक्यात डोंगरगावासह लक्ष्मी दहिवडी, वाफळे या गावांतील जलसाठे दत्तक घेऊन त्यांचे पुनर्संचयन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader