Varsha Gaikwad : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. असं असतानाच आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील फुटीसंदर्भातील चर्चांनी जोर धरला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केलं आहे. “आम्हीही मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढवायच्या यावर वरिष्ठांशी बोलून ठरवू”, असं त्यांनी म्हटलं आहे. त्या टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.
हेही वाचा : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
“महाविकास आघाडी एकत्र राहण्याची अपेक्षा आहे. ठाकरे गटाच्या महापालिका निवडणुकीच्या भूमिकेसंदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार आहोत. त्यानंतर निर्णय घेऊ. मात्र, संजय राऊतांनी अशा प्रकारे जाहीर बोलण्यापेक्षा चर्चा करायला हवी होती. पण संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाचं मत मांडलं असेल. आमच्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं असं आहे की आम्हाला निवडणुकीत संधी मिळायला पाहिजे. विधानसभेला मुंबईमध्ये काही ठिकाणी आमच्या जागा निवडून येऊ शकल्या असत्या. महाविकास आघाडीचा लोकसभा एकत्र लढवण्याचा निर्णय झाला होता तेव्हा मी लोकसभेचं तिकीट वेगळीकडे मागितलं होतं. मात्र, मला वेगळ्या ठिकाणी तिकीट देण्याचं आलं. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला काही जागा हव्या होत्या, पण आम्हाला मिळाल्या नाहीत. तरीही आम्ही आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळल. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मुंबईत जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण दुर्देवाने जास्त जागा मिळाल्या नाहीत. आता महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा? ते पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ठरवू”, असं वर्षा गायकवाड म्हटलं आहे.
ठाकरे गटाने महापालिकेबाबत काय घोषणा केली?
“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचं असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.