सांगली :  जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशाचे खुले निंमत्रण (खुली ऑफर) रविवारी दिले. मात्र, या निमंत्रणाला नकार देत विकासासाठी पक्ष भेद बाजूला ठेवून काम करण्याची आपली मानसिकता असल्याचे खा. विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या  पत्रकार बैठकीत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचं असते. वर्तमानामध्ये खा. पाटील यांच्या हाती अजून चार वर्षे दोन महिने बाकी आहेत. खासदारकीच्या उर्वरित कालावधीचा आम्ही विचार करतो. ते भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजप खासदारांची संख्याही वाढेल. यासाठी मी त्यांना खुले निमंत्रण (खुली ऑफर) देतो. त्यांनी जर भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा  निश्‍चितच जिल्ह्याच्या विकासासाठी चांगला फायदा होउ शकेल. विकासासाठी त्यांच्या काही कल्पना असतील तर त्यालाही यामुळे पाठबळ मिळेल असेही मंत्री पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या आवाहनावर बोलताना  खा. पाटील म्हणाले, मी  ज्या पध्दतीने संसदेत  प्रश्‍न मांडतोय, ही कामाची पध्दत पालकमंत्री पाटील यांना आवडली असावी. भाजप प्रवेशाचे आवाहन जर केेले जात असेल तर मी चांगले काम करतोय याची पोचपावती असल्याचे मी मानतो. मात्र, मी भाजप प्रवेशाबाबत कोणताही विचार केलेला नाही, करणार नाही. कायद्याने मी अन्य दुसर्‍या पक्षात जाउ शकत नाही. सर्व पक्षाच्या  लोकप्रतिनिधींनी गट, तट, पक्ष बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशीच आपली भूमिका आहे आणि यापुढेही राहील असेही खा. पाटील म्हणाले.