काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अदर पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसं काय देऊ शकतं? अशी विचारणा नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. यामागे काय लपलं आहे हे वास्तव समोर आलं पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांपासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे धमक्यांचे फोन; पुनावालांवर लशीसाठी दबाव
अदर पूनावाला यांनी टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्र्यांपासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे धमक्यांचे फोन येत असल्याचा खुलासा केला आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता, “अदर पूनावाला यांनी आपल्याला देशातील मोठ्या नेत्यांनी धमकावल्याचं म्हटलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते असूच शकत नाही,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.
“केंद्र सरकारने अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. अजून सुरक्षा हवी असेल तर दिली जाईल. काँग्रेसही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण त्यांनी धमकावणारे हे नेते कोण आहेत हे अदर पूनावाला यांनी जाहीर करावं,” असंही ते म्हणाले. राज्याच्या जनतेसोबत देशातील जनतेचं लसीकरण होणं ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
Adar Poonawalla (Serum Institute of India CEO) said that he was threatened by some senior leaders. Congress takes full responsibility of his security. But he should make it public as to who are these leaders: Maharashtra Congress Chief Nana Patole pic.twitter.com/NKmXjxPbDM
— ANI (@ANI) May 3, 2021
लसीच्या दरासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “देशात अशा स्थितीत केंद्र सरकारने सर्व जबाबदारी घ्यायला हवी होती. पण पंतप्रधानांनी राज्यांना जबाबदारी घेण्यास सांगितलं. त्यावेळी दर निश्चित करण्यात आले. पण जगात कुठेही एकाच गोष्टीचे तीन वेगळे दर असू शकत नाही. पण मोदी है तो मुमकीन है असंच दिसत आहे”. सरकारने रेमडेसिविर खुल्या बाजारात आणलं असतं तर काळाबाजार झाला नसता असं ते म्हणाले.
“केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशातील लोकांचे जीव जात आहेत. केंद्रातील सरकार सातत्याने लोकांच्या जीवाचं राजकारण करत आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.