नांदेड, बीड : मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन येत्या २० तारखेला बोलविण्यात आले आहे. तरीही आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने शुक्रवारपासून ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले. या दरम्यान नांदेड (द.) मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. एकंदर स्थिती पाहून परिवहन महामंडळाने शनिवारी जिल्ह्यातील बससेवा बंद ठेवली.
हेही वाचा >>> नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे! शिवसेनेच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आवाहन
आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठवडयापासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याच्या बातम्या आल्यानंतर जिल्ह्यात शुक्रवारी भोकर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. भोकर, बारड आदी गावांमध्ये बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी खरबी येथेही आंदोलन झाले. त्याआधी नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी येथे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या आमदार हंबर्डे यांचे वाहन अडवून आंदोलकांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. हंबर्डे यांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी आमदारांनी तक्रार नोंदविली नाही. परळी- बीड आणि गंगाखेड रस्त्याला जोडणाऱ्या चौकात सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी चक्का जाम केल्याने वाहतूक खोळंबली.
मराठा समाजासाठी मी घरचा माणूस आहे. त्यांनी रागातून माझ्या गाडीवर दगडफेक केली. हा समाज घरच्या माणसालाही सोडत नाही. यावरून सरकारने त्यांची भावना समजून घ्यावी. – मोहन हंबर्डे, काँग्रेस</strong> आमदार