जिल्ह्य़ातील नव्याने अस्तित्वात आलेल्या गुहागर आणि देवरुख नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होईल, असा विश्वास जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. या दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गेल्या १ मार्चपासून सुरुवात झाली असून, आज (७ मार्च) अखेरचा दिवस आहे. ३१ मार्च रोजी मतदान असून १ एप्रिल रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना जाधव म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्य़ातील या दोन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या निवडणुकांसाठी संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असून उद्यापर्यंत त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे तेथे आघाडी अवघड दिसत आहे.
या जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते संदेश पारकर यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. नीलेश राणे यांच्याशी जाधव यांचे असलेले सख्य सर्वज्ञात आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागर नगर पंचायतीच्या क्षेत्रात विविध विकास योजनांसाठी नगर विकास खात्यातर्फे सुमारे चार कोटी रुपये, तर देवरुख नगर पंचायतीच्या परिसरात दोन कोटी रुपयांचा निधी पूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवडणुकीनंतरही विकासाच्या विविध योजना विचाराधीन आहेत. त्यामुळे मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूने कौल देतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
गेल्या महिन्यात आपल्या मुलांच्या विवाहाप्रीत्यर्थ आयोजित शाही सोहळ्यामुळे जाधव वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विशेषत: खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सोहळ्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे जाधव यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी जोरदार आघाडी उघडली होती, पण या निवडणुकांची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर सोपवून तो विषय संपला असल्याचेच स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जाधव समर्थकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.