आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, अन्य मित्र पक्षांना ८ जागा सोडण्यात येणार आहेत. भाजप-शिवसेना विरोधात उभारण्यात येणाऱ्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असून, त्यांच्या पक्षाला ४ जागा सोडण्याची तयारी केली आहे.   आमची आघाडी  राज्यातील ४८ पैकी ३५ जागा जिंकेल असा दावा  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संसदीय पक्षाची बैठक झाली.  बैठकीत महाआघाडीत आतापर्यंत झालेल्या जागावाटपाच्या समझोत्यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांचीही चाचपणी या वेळी करण्यात आली. या निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची रणनीती राष्ट्रवादीची राहणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांना चार जागा

भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपच्या विरोधात लढण्यासाठी प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत येतील, त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार जागा सोडण्याची तयारी केली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अन्य मित्र पक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष एक आणि आघाडीत सामील झाल्यास मनसेला एक जागा देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

संघाच्या विरोधातील भूमिका स्पष्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत कसे आणणार, त्याचा आराखडा द्या, अशी अट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला घातली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता, आरएसएसच्या संदर्भातील आमची भूमिका स्पष्ट आहे, आंबेडकरांनी आराखडा द्यावा, त्यावर कोणाच्या सह्य़ा पाहिजेत तेही त्यांनी सांगावे, तशा सह्य़ा करुन द्यायला आम्ही तयार आहेत,असे अजित पवार यांनी सागितले.

माढामधून शरद पवार?

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असे मत सर्वच नेत्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे पटेल यांनी सांगितले. पवार यांनी सर्वाचे म्हणणे ऐकूण घेतले, त्यांचा निर्णय ते नंतर सांगणार आहेत, त्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

नांदेड, परळीला संयुक्त सभा

महाआघाडीची एकत्रित पहिली सभा २० फेब्रुवारीला नांदेडमध्ये तर, दुसरी सभा परळी येथे २३ फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.