गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला. सत्तेत असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लीम व मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा केली. पण ही घोषणा फसवी निघाली. आता युती सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला आहे. परंतु मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. युती सरकार हे दुटप्पी भावनेने निर्णय घेत असून, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले एखाद्या नाटक कंपनीसारखे वागले आहेत. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु आरक्षण हा मुस्लीम समाजाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी केले.
मुस्लीम आरक्षणासंदर्भात मंगळवारी येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी ओवेसी बोलत होते. व्यासपीठावर औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची उपस्थिती होती. ओवेसी म्हणाले की, १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ इफ्तार पार्टी देऊन समाजाला आपल्याकडे आकर्षति करण्याचा प्रयत्न केला. एमआयएमने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उतरविलेल्या उमेदवारांना ५ लाख २४ हजार मते मिळाली. एकूण मुस्लीम मतदानाच्या ६० टक्के मतदान निवडणुकीत झाले. असे असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडले. परंतु पवारसाहेब उरलेली मते गेली कुठे, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीची वेळ आता संपली. राष्ट्रवादीचे घडय़ाळ बंद पडले, तर काँग्रेसच्या हातालाही जनतेने हात दाखवला. एमआयएमवर जातीयवादी असल्याचा आरोप केला जातो. खरे जातीयवादी कोण, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. मराठा आरक्षणासाठी कायदा केला जातो, तर मुस्लीम समाजावर अन्याय का, असा सवाल ओवेसी यांनी केला. आरक्षण हा मुस्लीम समाजाचा अधिकार असल्याचे सांगतानाच मुस्लीम समाजातील आयपीएस, आयएएस अधिकारी किती आहेत याचा आकडाही सरकारने नियुक्त केलेल्या विविध आयोगांनी समोर मांडला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील पोलीस दलात केवळ ४ टक्के मुस्लिमांना संधी देण्यात आली. आरक्षण मिळाले तर पोलीस दलातील टक्काही वाढेल. या साठी सर्वानी संघटित होऊन एकत्रित लढा उभारण्याचे आवाहन ओवेसी यांनी केले. महाराष्ट्रातील २८ टक्के मुस्लीम तरुण आजही कारागृहात आहेत. यातील दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या. परंतु निर्दोष आहेत त्यांच्याबाबत कोण आवाज उठविणार, असा सवालही त्यांनी केला.
भारतात ४ हजार ६०० जाती-धर्मातील लोक राहतात, असे स्पष्ट झाले आहे. भारत एका विशिष्ट धर्माचा देश नसून सर्व धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. त्यामुळे २०२१ काय, २०९० पर्यंतही धर्मातर होणार नाही, असा दावा ओवेसी यांनी केला. मुस्लीम समाजातील लहान मुलांच्या हाती झाडू नव्हे तर लेखणी देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयएम हा पक्ष कोणत्या धर्माविरुद्ध नसून न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

Story img Loader