तिढा सोडविण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना ७१ हजारांची आघाडी मिळाली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी स्वत:कडेच कायम राखणार की काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडणार, याची चर्चा आता रंगली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर हा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे करीत होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भारणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. आघाडीत ज्याचा आमदार त्या पक्षाकडे मतदारसंघ हे सूत्र निश्चित आहे. यानुसार इंदापूरवर राष्ट्रवादीचा हक्क आहे. पण हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काँग्रेसला हा मतदारसंघ हवा आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात फारसा सलोखा नव्हता. यामुळेच अजित पवार यांनी प्रत्येक वेळा हर्षवर्धन पाटील यांना विरोध केला होता. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे कायम राहणार असल्यास हर्षवर्धन पाटील यांनी अन्य पर्यायांचा विचार सुरू केला होता. पण काँग्रेसने हा मतदारसंघ मिळेल, अशी ग्वाही दिल्याने पाटील यांनी विचार बदलला.

लोकसभा निवडणुकीच्या काळात बारामती मतदारसंघ हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी महत्त्वाचा होता. भाजपने आव्हान उभे केल्याने पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघात पिछाडीवर राहणार हे स्पष्ट होते. बारामती आणि इंदापूर या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीची भिस्त होती. पण हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. तेव्हा इंदापूरचा निर्णय हा आघाडीत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या पातळीवर घेतला जावा, असा निर्णय घेण्यात आला. हे मान्य झाल्यावरच हर्षवर्धन पाटील हे प्रचारात सहभागी झाले.

इंदापूरमध्ये सुळे यांना ७१ हजारांचे विक्रमी मताधिक्य मिळाले. २०१४च्या निवडणुकीतही शरद पवारांच्या मध्यस्थीने हर्षवर्धन पाटील यांनी प्रचारात भाग घेतला होता. पण नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी नव्हती. यावेळी आघाडी असल्याने अजितदादा हे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी एक पाऊल मागे घेणार का, हा प्रश्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पाटील यांनी मेहनत घेतली. हे लक्षात घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे तरी मदतीची परतफेड करतील, अशी शक्यता काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील नेत्याने व्यक्त केली. आघाडीच्या चर्चेतच इंदापूरचा प्रश्न सुटेल. तोपर्यंत ‘तू तू मै मै’ कायम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.