लोकसभेतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला आघाडीत सामील करून घ्यावे, असा आग्रह काँग्रेस व राष्ट्रवादीतील आमदार व पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा राज्यात दारुण पराभव झाला. या पराभवावर सध्या दोन्ही पक्षात चिंतन सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असल्याने आता रिंगणात कसे उतरायचे, असा प्रश्न काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावत आहे. त्यातूनच आता विविध बैठकांमधून नवनवे पर्याय समोर येऊ लागले आहेत. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीची, तर त्या आधी काँग्रेसच्या पदाधिकारी व नेत्यांची बैठक मुंबईत झाली. यात बोलताना या नेत्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना आघाडी अधिक व्यापक करावी, असा पर्याय सुचवला आहे. काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांनी विधानसभेसाठी बसपशी आघाडी करावी, असे पक्षाच्या नेत्यांना सुचवले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या बैठकीतही विदर्भातील नेत्यांनी बसपला सोबत घ्यावे, असे मत व्यक्त केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेमुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षालासुद्धा दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पक्षाला एकही जागा मिळाली नसली तरी पक्षाच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी लक्षणीय मते घेतली. विदर्भातील तीन मतदारसंघात या पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भगव्या शक्तीचा पाडाव करायचा असेल तर बसपला आघाडीत सामील करून घ्यावे, असा आग्रह या दोन्ही पक्षातील नेत्यांनी नेतृत्वाकडे धरला आहे. बहुजन समाज पक्ष राज्यात आजवर स्वतंत्रपणे निवडणूक लढत आला आहे. तरीही सध्याची परिस्थिती लक्षात घेता या पक्षाचे नेते आघाडीत सामील होण्यासाठी तयार होतील, असे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदाराने ‘लोकसत्ता’शी मंगळवारी बोलताना व्यक्त केले. सद्यस्थितीत किमान बोलणी सुरू करण्यासाठी तरी हरकत नाही, असे या आमदाराचे म्हणणे आहे. लोकसभेच्या वेळी राज्यातील भाजप-सेना युतीने आणखी काही पक्षांना सामील करून घेऊन युतीला महायुतीचे स्वरूप दिले. हाच प्रकार काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी सुद्धा करू शकते व आघाडीचे रूपांतर महाआघाडीत केले जाऊ शकते, असे मत राष्ट्रवादीच्या एका नेत्याने व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांना सोबत घेतांनाच एकगठ्ठा मते असलेल्या बसपला सोबत घेतले तर किमान मानहानीकारक पराभव तरी टाळता येईल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.