नांदेड : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीसह खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये अद्याप स्थान मिळालेले नाही. या दोन नेत्यांना अधांतरी ठेवून काँग्रेसने बुधवारी (२० फेब्रुवारी) मित्रपक्षांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

काँग्रेस आणि मित्रपक्षांची जाहीर सभा निश्चित झालेली असताना, अ‍ॅड. आंबेडकर आणि खासदार शेट्टी मराठवाडय़ात येऊन गेले. त्यांनी केलेल वक्तव्य तसेच त्यांना भेटलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत असलेली माहिती लक्षात घेता काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात अ‍ॅड. आंबेडकर आणि खासदार शेट्टी यांचे समाधान झालेले नाही. केवळ हातकणंगले मतदारसंघासाठी आपण आघाडीत सामील होणार नाही, असे खासदार शेट्टी यांनी आपल्या पक्ष-संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले.

खासदार शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघासोबत रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलढाणा आणि माजी मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी वर्धा असे तीन मतदारसंघ मिळाले तरच महाआघाडीत सामील होण्याची भूमिका मांडली असल्याचे स्वाभिमानीच्या एका पदाधिकाऱ्याने येथे सांगितले. ही मागणी मान्य न झाल्यास पुढे काय करायचे, याचा निर्णय स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बठकीत घेतला जाणार आहे.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वप्रथम नांदेडच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी खासदार ओवेसी यांच्यासह नांदेडमध्ये मोठी सभा घेतली. त्यानंतरच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली; पण त्यातून तोडगा निघालेला नाही. आतापर्यंत आंबेडकरांनी ११ उमेदवार जाहीर केले आहेत. या सर्व (नांदेडसह) जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नांदेड दौऱ्याचे निमित्त साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी नांदेडमध्ये संयुक्त जाहीर सभेचे आयोजन केले असून त्यांच्या समर्थकांनी या सभेची तयारी चालविली आहे. आयोजनात दोन काँग्रेस पक्षांशिवाय पीआरपी (कवाडे), रिपाइं (गवई गट), शेकाप, माकप इत्यादी पक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत; पण खासदार राजू शेट्टी यांच्या पक्षाला द्यावयाच्या जागांचा पेच सुटला नसल्याने ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी व कार्यकत्रे बुधवारच्या सभेमध्ये सहभागी होणार नाहीत, असे सांगण्यात आले.

Story img Loader