रायगड जिल्ह्य़ात शेकाप आणि राष्ट्रवादीतून एकेकाळी विस्तवही जात नव्हता. सुनील तटकरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे निमित्त करून शेकापने आघाडी सरकार अस्थिर केले होते. जिल्ह्य़ाच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ होती. मात्र पुढे संदर्भ बदलत गेले. सुनील तटकरे आणि भाई जयंत पाटील यांनी एकमेकांपुढे मदतीचा हात पुढे केला आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र रिंगणात उतरणार आहेत.
राष्ट्रवादी आणि शेकापमध्ये तसे सूर जुळले ते लोकसभा निवडणुकीपासून. तटकरे यांच्या विरोधात शेकापचे रमेश कदम रिंगणात होते, पण शेकापने रायगडमध्ये तटकरे यांच्या मागे ताकद उभी केली. शेजारील मावळ लोकसभा मतदारसंघात एकेकाळचे राष्ट्रवादीचेच लक्ष्मण जगताप हे शेकापचे तर राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. रायगडची भरपाई राष्ट्रवादीने मावळमध्ये केली. तेथे राष्ट्रवादीने शेकापच्या जगताप यांच्यामागे ताकद लाववी. अर्थात, तटकरे आणि जगताप हे दोघेही पराभूत झाले. पण त्यातूनच उभयतांमधील दोस्ताना वाढत गेला.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसशी काडीमोड घेतला. रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, उरण, पनवेल, महाड आणि कर्जत मतदारसघांत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. राज्य सरकारमध्ये सलग १५ वर्षे कोकणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या. सातपकी पाच जागांवर पक्षाचा दारुण पराभव झाला होता. पाचही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, तर श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे अवघ्या ७७ मतांनी तर कर्जत मतदारसंघातून सुरेश लाड अडीच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा फायदा या दोन्ही उमेदवारांच्या पथ्यावर पडला.
तटकरेंची निराशा
विधानसभा निवडणुकीतील ही कामगिरी पक्षासाठी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी निराशाजनक होती. जिल्ह्य़ाचे सर्वाधिक काळ पालकमंत्रीपद तटकरे यानी भूषवले, तिथे हा पराभव मानहानीकारक होता. विधानसभा निवडणुकीतील या ढिसाळ कामगिरीतून बोध घेऊन आता राष्ट्रवादीने शेकापशी मैत्रीचा हात पुढे केला. आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रित लढवणार असून तशी घोषणा सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली आहे. शेकापची उत्तर रायगडात मोठी ताकद आहे. शिवाय दक्षिण रायगडात माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात शेकापची काही पारंपरिक मते आहेत. या मतांवर राष्ट्रवादीचा डोळा आहे. अलिबाग, पेण, पनवेल, उरण या तालुक्यात राष्ट्रवादीला फारसे स्थान राहिलेले नाही. कर्जत, खालापूर, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, महाड, पोलादपूर आणि माणगाव या तालुक्यावर राष्ट्रवादीचा भर असणार आहे. त्यामुळे शेकापची साथ पक्षासाठी मोलाची ठरेल असा विश्वास पक्षाला वाटतो आहे.
जिल्हयातील अनेक भागात आजवर शेकाप आणि राष्ट्रवादी पारंपरिक शत्रू राहिले आहेत. दोन्ही पक्षातील वाद अनेकदा हातघाईवर गेले आहेत. आता शेकापसारख्या पारंपरिक विरोधकाबरोबर जुळवून घेण्याचा सल्ला तटकरे देत असल्याने कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाली आहे. रोहा, माणगाव, सुधागड पाली, अलिबागसारख्या तालुक्यांत पक्षात या आघाडी बाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षातील ही नाराजी कशी दूर होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.