भाजप-शिवसेनेचे खासदार हंसराज अहीर व शेतकरी संघटना-आप युतीचे अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, कांॅग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार ठरला नसल्याने या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता बघायला मिळत आहे.
येत्या १० एप्रिल रोजी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीला अवघे २५ दिवस शिल्लक आहेत. त्यातही १५ मार्चला अधिसूचना जाहीर होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून अधिकृत प्रचाराला सुरुवात करायची आहे. परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार अजूनही निश्चित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता बघायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली, त्याच्या दोन महिन्यापूर्वीच भाजप-शिवसेना युतीने विद्यमान खासदार हंसराज अहीर यांची उमेदवारी जाहीर केली. तर शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच २०१४ च्या लोकसभेसाठी कामाला लागले.
अहीर व चटप यांनी या कालावधीत अख्खा लोकसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. गोंडपिंपरी पासून तर आर्णी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत हे दोघेही जावून आले आहेत. या मतदारसंघातील मतदारांसाठी अहीर व चटप ही नावे आता नवखी राहिलेली नाहीत. सातत्याने जनसंपर्कावर भर देणाऱ्या या दोन्ही नेत्यांची तोंडओळख या क्षेत्रातील बहुतांश मतदारांना आहे. याउलट परिस्थिती कांॅग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराची होणार आहे. कारण त्याला तोंड ओळख करण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री संजय देवतळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी वामनराव कासावार, माजी खासदार नरेश पुगलिया यांचे नाव सुध्दा चर्चेत आहेत. कांॅग्रेसची एकूणच कामाची पद्धत बघता ऐनवेळी शिवाजीराव मोघे यांना सुध्दा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या सर्व नेत्यांना या क्षेत्रातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून केवळ पुगलिया यांची ओळख आहे. तर पालकमंत्री संजय देवतळे यांचा जिल्हय़ात तर सोडा बाहेरच्या जिल्हय़ात सुध्दा जनसंपर्क नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर प्रचारासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी सुध्दा नाही. जे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वमान्यता नाही. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी सर्वमान्य नेत्याची निवड करावी लागणार आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे सध्यातरी असा नेता या जिल्हय़ात कॉंग्रेसमध्ये केवळ प्रभाकरराव मामुलकर यांच्याशिवाय दुसरा नाही. त्यातही मामुलकर यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळे अडचण झाली आहे. कासावार यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना सुध्दा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण त्यांचा जनसंपर्क केवळ वणी विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादित आहे. त्यातही ते विधानसभेतील पराभूत उमेदवार असल्याने बरीच कसरत करावी लागणार आहे.
 मध्यममार्ग काढून ऐनवेळी मोघे यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांना वयाची अडचण जाणवणार आहे. एकूणच काँंग्रेसने उमेदवारी जाहीर केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता बघायला मिळत आहे. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी गटबाजीचा सामना करावा लागणार हे कटू सत्य आहे. त्यामुळे वरिष्ठांनी एकदा उमेदवारी जाहीर करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला प्रचारात गुंतवावे अशी सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. उमेदवारी जाहीर करण्यातच विलंब लागत असेल तर प्रचाराला वेळ कमी मिळणार आणि कॉंग्रेसचा उमेदवार शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचू शकणार नाही अशीही खंत कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. एकूणच महायुतीचे अहीर व शेतकरी संघटना-आपचे अ‍ॅड. चटप प्रचारात बरेच समोर निघून गेले असून, याउलट कांॅग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरुवात सुध्दा झालेली नाही.