राज्यात एकीकडे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून राजकारण आणि पडद्यामागून हालचाली वाढल्या असताना दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस आमदार नितीन राऊत हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीन राऊत यांच्याकडे सध्या ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार असून नागपूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे. मात्र, त्यात आता विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून त्यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याविषयी नितीन राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, त्यांच्याकडून अचानकपणे काढून घेतलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती समितीच्या अध्यक्षपदाविषयी देखील त्यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

“मला वाटत नाही माझा विचार होईल, कारण…”

नितीन राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपदाविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मला वाटत नाही की माझा विचार विधानसभा अध्यक्षपदासाठी होतोय. कारण महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर शपथविधीवेळी मला विचारणा केली होती की तुम्ही अध्यक्ष व्हा. तेव्हा मी त्यांना सांगितलं की अध्यक्ष करण्यापेक्षा मला मंत्री केलं तर मला लोकांमध्ये फिरता येईल आणि पक्षाचं काम करता येईल. आजच्या या घटकेलाही काँग्रेस नक्कीच याच पद्धतीने माझ्याकडे पाहात आहे. त्यामुळे असं काही होईल असं मला वाटत नाही”, असं नितीन राऊत म्हणाले.

तेव्हाच मला वाटलं होतं…

दरम्यान, नितीन राऊत यांच्याकडून काँग्रेसच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती समितीचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं आहे. त्यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना त्यांनी यावर खुलासा केला आहे. “२७ मार्च २०१८ ला तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी माझी अनुसूचित जाती विभाग अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नियुक्ती केली होती. २०१९मध्ये डिसेंबरला मी आमदार निवडून आलो. महाविकासआघाडीचं सरकार आलं तेव्हा माझा मंत्री म्हणून शपथविधी झाला. तेव्हाच मला या पदाचा राजीनामा द्यावा लागेल याची चाहूल लागली होती. नंतर करोना वगैरे सुरू झालं”, असं ते म्हणाले.

“राज्यपालांचे अधिकार कमी करणं हे संविधान….;” देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

“मला निरोप आला, वन मॅन वन पोस्ट…”

पक्षाकडून आपल्याला वन मॅन वन पोस्टचा निरोप आल्याचं राऊत यांनी सांगितलं. “मध्यंतरी मला निरोप आला होता की वन मॅन वन पोस्ट या नियमानं एकच पोस्ट सांभाळता येईल. आज पक्षानं योग्य व्यक्ती शोधून मला त्या पदावरून मुक्त केलं आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याची धुरा माझ्या खांद्यावर आहे. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही मी काम करत आहे. त्यात एससी समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देश फिरताना राज्यात कमी वेळ मिळत होता. पण आता मला अधिकचा वेळ मिळेल आणि माझ्या मतदारसंघावर मला लक्ष देता येईल”, असं ते म्हणाले.

Story img Loader