Vijay Wadettiwar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील काँग्रेसचे मुख्यालय फोडले. काँग्रेस मुख्यालयात जात खुर्च्या तोडण्यात आल्या. शाहीफेक करण्यात आली. दगडफेकही केली गेली. या जमावाला पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्जही केला. आता या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “भाजपाचे कार्यकर्ते नसून भाजपाचे पोसलेले गुंड आहेत. आम्हीही आंदोलने केलीत, पण हातात दगडगोंडे घेतले नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्याला विरोध म्हणून काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला होत असेल, खुर्च्या फोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न असेल तर हे गंभीर आहे.”

हेही वाचा >> मुंबईत भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेसचं कार्यालय फोडलं, शाही अन् दगडफेक; पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न!

सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांची हिंमत वाढली

“कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. राज्यात सरकारला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशा दोन घटना घडल्या आहेत. दलित बांधवावर अन्याय अत्याचार झाला, परभणीत एकाचा जीव घेतला. संतोष देशमुख नामक सरपंचाचाही जीव घेतला. हे काही कमी आहे? यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढतेय. आता सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांची हिंमत वाढतेय. विरोधकांची कार्यालये तोडफोड केली जात आहेत. बाबासाहेबांचा अवमान झाला, यावर प्रतिक्रिया उमटवणार स्वाभाविक आहे. बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांकडून प्रतिक्रिया येणारच”, असं वडेट्टीवार म्हणाले.

“भाजयुमोचे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आले. याचा अर्थ आम्हाला वाटलं की ते आमच्याबरोबर आहेत. पण त्यांनी तिथे गेल्यावर प्रतिमा बाजूला केली. त्यांनी दरवाज्यावर दगडं मारून खुर्च्या तोडल्या. ऑफिस उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. पोलीस काय करत होते? तुम्ही लोकशाही मानत असाल तर आम्हीही आंदोलन केलं, पण आम्ही कोणावर दगडफेक केली नाही”, असं वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

“अमित शाहांनी बाबासाहेबांचा अपमान केला. त्याची प्रतिक्रिया देशभर उमटली. जागोजागी आंदोलन झाले. हे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे. कोणी कितीही मोठा असला तरी बाबासाहेबांचा अपमान करू नये. संविधानातून अधिकार प्राप्त झाले आहेत. आंदोलन करत आहोत म्हणून पक्षकार्यालयात जाऊन दगडफेक करणं हे गुंडगिरीचं लक्षण आहे. तुम्ही लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. गुंडप्रवृत्तीने कशाला?” असाही सवाल त्यांनी विचारला.

सत्ता आल्यापासून…

“सत्ता आल्यापासून आम्ही पाहतोय, परभणीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली माणसांचे जीव घेतले. कोणतं पाप केलं होतं? कोणाचा खून केला होता? सत्ता मिळाल्यावर अशा पद्धतीने वापर करणार का? पोलिसांना कोणाच्या सूचना होत्या? काय कारवाई केली पोलिसांवर?” असे अनेक प्रश्नही यानिमित्ताने विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केले.

Story img Loader