आरोंदा किरणपाणी पोर्टच्या स्थानिक संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसने उडी घेतली. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्थानिक समितीला पाठिंबा दिला असून, जिल्हा प्रशासनाने येत्या आठ दिवसात बेकायदेशीर भिंत व कामाची चौकशी करून अडथळे दूर केले नाहीत तर जिल्हाधिकारी यांचीच गाडी अडविली जाईल असा इशारा जिल्हा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिला.
आरोंदा किरणपाणी पोर्टच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या समितीसोबत जेटीची पाहणी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, संदीप कुडतरकर, माजी सभापती प्रकाश कवठणकर आदींनी केली. त्यांच्यासोबत संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश शिरोडकर, विद्याधर नाईक, विष्णू नाईक, मनोहर आरोंदेकर, उमा बुडे, गोविंद केरकर, गोकुळदास मोठे, आत्माराम आचरेकर, संदीप नेमळेकर, बी. डी. पेडणेकर आदी उपस्थित होते.
आरोंदा जेटी दरम्यान जाणारा सरकारी रस्ता बंद केला, तेरेखोल खाडीदरम्यान भिंती घालून लोकांचा मार्ग बंद केला. गणेश विसर्जन मार्गावर मोठी भिंत उभी केली, तसेच पर्यावरणीय नियमांचे भंग केल्याकडे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी लक्ष वेधले.
यावेळी बोलताना डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आरोंदा जेटी, पर्यावरणाचे नियम, कायदे तोडून उभारली जात आहे. लोकांचा हक्क हिरावून घेण्यात येत आहे, असे सांगून काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्थानिक समितीला पाठिंबाही दिला आहे. जेटी होऊ देणार नाही असे म्हटल्याचे डॉ. परुळेकर म्हणाले. कोणत्याही विधायक कामाला नारायण राणे यांचा पाठिंबा आहे. पण या जेटीने सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून काम झाले आहे. सरकारी रस्ता बंद करून भिंत उभारली आहे, तसेच कांदळवनाची तोड करून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे जेटीला काँग्रेसचा विरोध आहे असे डॉ. परुळेकर म्हणाले.
समुद्र विज्ञान संस्था गोवा व अन्य संस्थांच्या सहकार्याने समुद्राच्या खाडीकिनारी भागाकडे एक भली मोठी नैसर्गिक भिंत आहे ती तोडल्यास होणाऱ्या धोक्याचा अभ्यास करणार आहोत.
पूर्वजांनी विचार करूनच गावे वसविली तीच गावे उद्ध्वस्त होणार असतील तर विरोध करावाच लागेल, तसेच ही नैसर्गिक खडकांची भिंत तोडल्यास आरोंदा, बांदा, गोवा भागाला धोका होऊ शकतो असे डॉ. जयेंद्र परुळेकर व अविनाश शिरोडकर यांनी बोलताना सांगितले.
पर्यावरणीय मुद्दा जागतिक आहे, पण आरोंद्यात दुर्लक्षिला जात आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी झोपले असतील तर त्यांना जागे करावे लागेल. सीआरझेड कायद्याचे उल्लंघनही होत आहे असे डॉ. जयेंद्र परुळकेर यांनी सांगून जिल्हाधिकारी यांनी आठवडाभरात बेकायदेशीर कामे, भिंत हटविली नाही तर जिल्हाधिकारी यांनाच रास्ता रोकोला सामोरे जावे लागेल असे डॉ. परुळेकर म्हणाले.
मच्छीमारांची रोजीरोटी काढून घेत असेल तर गप्प बसणार नाही असे डॉ. परुळेकर यांनी सांगून नारायण राणे यांच्या नावाचा राजन तेली यांनी गैरवापर केला आहे. राणेंची बदनामी करणाऱ्या राजन तेली यांना दादा (राणे) पाठीशी घालणार नाहीत असे सांगत पर्यावरणीय परवानगी मिळाली नसताना जेटी सुरूच कशी होते असा प्रश्नही डॉ. परुळेकर यांनी उपस्थित करून राजन तेली यांचा समाचार घेतला.
काँग्रेस आरोंदा जेटीविरोधात आंदोलनात रस्त्यावर उतरेल असा इशारा डॉ. परुळेकर यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा