कुठल्याही प्रश्नावर ना आंदोलने, ना विरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात व केंद्रात सत्तेबाहेर राहून अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरी सोलापूरच्या काँग्रेस पक्षाला विरोधकात असल्याची जाणीव अद्यापि झाली नाही. तर अजूनही ‘शेठजी व भटजी’च्या कोषातच येथील पक्षाचे नेतृत्व वावरत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या चुकांच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता अद्यापि तयार झाली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्याच्या विरोधात आंदोलनाची घोषणा करायची आणि ऐनवेळी माघार घ्यायची, हीच येथील काँग्रेस पक्षाची पद्धत आता रूढ झाल्याचे दिसून येते.

खादी ग्रामोद्योगाच्या भांडारात दिनदर्शिका व डायरीवर महात्मा गांधीजींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबी वापरण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्या विरोधात सोलापूरच्या काँग्रेस पक्ष शाखेने रेल्वेस्थानकासमोरील महात्मा गांधी पुतळय़ासमोर मूक धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. परंतु ऐनवेळी हे आंदोलन रद्द करण्यात आले. याअगोदर, नोटाबंदी झाल्यानंतर चलनकल्लोळ तीव्र झाला असता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीची सुमारे एक कोटीची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. त्या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सोलापूरच्या काँग्रेस शाखेने आंदोलन करण्याचे घोषित केले होते. परंतु त्या वेळीही आंदोलन झाले नव्हते. त्याच्ोवेळी पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सहकारमंत्री देशमुख यांची ‘विकेट’ घेण्याची गर्जना केली होती. मात्र प्रत्यक्षात तशी हालचालदेखील झाली नाही. नोटाबंदीच्या विरोधात प्रदेशश्रेष्ठींच्या आदेशानुसार झालेल्या आंदोलनाचा तेवढाच अपवाद ठरला. काल रेल्वेस्थानकासमोर महात्मा गांधी पुतळय़ासमोर मूक धरणे आंदोलन करण्याचे पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी जाहीर केले होते. त्यासाठी तयारीही झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी हे आंदोलन रहित झाल्याने खुद्द काँग्रेसच्या गोटातच आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या संदर्भात स्पष्टीकरण देताना शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलन होऊ  शकले नाही, असे नमूद केले. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनेक आक्षेपार्ह मुद्यांवर रान उठवण्याची संधी असताना सोलापुरात काँग्रेस पक्ष आक्रमक न होता मवाळ भूमिका बाळगून आहे. त्यामुळे ‘शेटजी व भटजी’च्या मानसिकतेतून पक्ष बाहेर येत नसल्याबद्दल निष्ठावंत कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करताना यापूर्वी १९७८ साली काँग्रेस पक्ष विरोधकात आणि तेवढाच अडचणीत असताना पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या आठवणीही जागवल्या जात आहेत. १९८७ साली  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात बोफोर्स तोफांच्या कथित घोटाळय़ाप्रकरणी आरोप केलेले दिवंगत माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग हे सोलापुरात आले असता त्या वेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे स्मरण करीत काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्षाच्या ‘वातानुकूलित’ कार्यपद्धतीवर खासगीत नाराजी व्यक्त केली.