शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या मुद्दय़ावर पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत मदानात उतरला आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी केवळ कागदोपत्री व फसवी असल्याचा आरोप करून काँग्रेसने राज्यव्यापी ‘एल्गार’ आंदोलनाचे हत्यार उपसले. यामध्ये काँग्रेस ‘आम्हाला कर्जमाफी मिळालीच नाही’ असा शेतकऱ्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. ‘एल्गार’च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या मतपेढीवर काँग्रेसचा डोळा असून, हातातून निसटत असलेला विदर्भाचा गड पुन्हा एकदा सर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांची सर्वाधिक समस्या प्रामुख्याने विदर्भात जाणवत असल्याने विरोधकांच्या राज्यव्यापी आंदोलनाचे बुलढाणा हे प्रमुख केंद्र बनले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकरयांना कुठलाही लाभ होत नसल्याचा आरोप करून काँग्रेसने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा घेऊन राज्यव्यापी आंदोलन पुकारले. या आंदोलनाला बुलढाणा जिल्हय़ातून सुरुवात झाली. बुलढाणा हा कृषिमंत्र्यांचा जिल्हा असतानाही या जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात कृषिमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप करून शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने मातृतीर्थ बुलढाणा जिल्हय़ातून एल्गार आंदोलनाला प्रारंभ केल्याचे स्पष्टीकरण खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.
‘आम्हाला कर्जमाफी मिळालीच नाही’ असा अर्ज काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकत्रे शेतकऱ्यांकडून दोन प्रतीत भरून घेणार आहेत. त्याची एक प्रत संबंधित तहसीलदार यांना देणार असून, दुसरी प्रत काँग्रेस जमा करणार आहे. २४ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोर्चा काढून काँग्रेस मुख्यमंत्र्यांना हे अर्ज सादर करीत त्यांना फसव्या कर्जमाफीच्या मुद्दय़ावर जाब विचारणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी आत्महत्या हा प्रामुख्याने विदर्भातील प्रश्न आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरोधकांकडून विदर्भातूनचा आंदोलनाची सुरुवात करण्यात येते. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवातही बुलढाणा जिल्हय़ातील सिंदखेडराजा येथून झाली होती. आता फसव्या कर्जमाफीविरोधातही एल्गार येथूनच पुकारण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने विदर्भ हा आपला अभेद गड निर्माण केला. विदर्भावर वर्चस्व मिळवल्याशिवाय राज्यात एकहाती सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याची जाणीव झाल्याने काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही विदर्भावर लक्ष्य केंद्रित केले आहे.
बुलढाणा जिल्हय़ावर काँग्रेसचे सर्व स्तरावर निर्वविाद वर्चस्व होते. काँग्रेसची पाळेमुळे गावागावापर्यंत रुजली होती. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. या वेळेस मात्र भाजपने काँग्रेसला धक्का देत प्रथमच जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला. लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. विधानसभेवर भाजपचे तीन, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. नगर पालिका निवडणुकीमध्येही काँग्रेस माघारली. सत्ता गेल्यानंतर आता पुन्हा उभारणी करण्यासाठी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हय़ात गत काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा, नोटाबंदीच्या वेळी आयोजित विविध कार्यक्रमांसह तुरीचे आंदोलन करण्यात आले. तुरीच्या आंदोलनामध्ये आ. राहुल बोंद्रे यांच्यासह १९ पदाधिकारी उपोषणास बसले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी तुरीचा मुद्दा उचलून धरला. आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत एल्गार पुकारण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील इतर जिल्हय़ांच्या तुलनेत बुलढाण्यात काँग्रेसची समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणाला आंदोलनाचे केंद्रिबदू करण्यात आले आहे. आता राज्यव्यापी एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरयांच्या प्रश्नावर लढा देण्यासोबत पक्ष संघटनेवर आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्नदेखील काँग्रेस नेतृत्वाकडून होणार आहे.
बुलढाण्यात भाजप-काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष
बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या एल्गार आंदोलनापूर्वी भाजप-काँग्रेस कार्यकत्रे भिडले. ‘आम्हाला कर्जमाफी मिळाली, मग आंदोलनाची गरज काय?’, असे म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करून खा.अशोक चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बुलढाण्यात १२ जुलला काँग्रेस व भाजपमध्ये तीव्र संघर्ष झाला. आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आता काँग्रेसने भाजप मंत्र्यांच्या गाडय़ा बुलढाणा जिल्हय़ात फिरकू न देण्याचा इशारा दिल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काँग्रेसचे शिवसेनेच्या पावलावर पाऊल
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दय़ावर एल्गार आंदोलन पुकारून काँग्रेसने शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकले आहे. यापूर्वी शिवसेनेनेही शेतकऱ्यांकडून ‘मी कर्जमुक्त होणारच’ असे अर्ज भरून घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते अर्ज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानंतरही शिवसेना शेतकरयांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक राहिली आहे. काँग्रेसनेही आता एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसही कर्जमाफी मिळाली नसल्याचे अर्ज मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. काँग्रेसने शिवसेनेप्रमाणेच आंदोलन पुकारून त्यांच्या मार्गावर चालत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सरकारचा फसवेपणा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दय़ावर सरकारचा फसवेपणा उघड झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी विषय टाळण्यासाठी फसवी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, शेतकरयांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. त्यामुळेच एल्गार आंदोलन पुकारण्यात आले आहे. – डॉ.सुधीर ढोणे, प्रवक्ता, काँग्रेस