सावंतवाडी : धर्माच्या नावाखाली भांडवलदारांचे हित साधले जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. तसेच फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षच देशाला न्याय मिळवून देऊ शकतो असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ सावंतवाडी मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर चालला आहे, त्यामुळे देशाची संस्कृती,परंपरा व विचारांचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या काळात कॉग्रेस आक्रमकतेने लढणार आहे. राहूल गांधी हा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा जास्त पटलावर असून भविष्यात हाच चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल असा आशावाद कॉग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,भाजपाने मंत्री नितेश राणे यांना समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात घेतले आहे. कोकणाला थोर विचारवंत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, लेखक, साहित्यिक लाभले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या वाचाळ पणामुळे कोकणची महाराष्ट्रात बदनामी होत आहे.
काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री सपकाळ यांनी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौरा केला. या ठिकाणी कार्यकर्त्यांची मेळाव्याच्या माध्यमातून ते संपर्क साधणार आहे आज सावंतवाडी येथे ते दाखल झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काँग्रेसचे नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधीस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वकील दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील, अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, ॲड.दिलीप नार्वेकर, विलास गावडे,राजू मसुरकर, नागेश मोर्ये,राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी, माया चिटणीस,आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, देशात काँग्रेस व भाजप हे दोनच पक्ष आहेत.काँग्रेस ही निरंतर चालणारी संघटना आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. वेगवेगळ्या पातळीवर या संघटनेचे कार्य सुरू आहे, म्हणून आजही काँग्रेस जिवंत आहे. सद्यस्थितीत ही संघटना कठीण काळातून जात आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र असे असले तरी काँग्रेस ही नेहमी संघर्षातच राहिली असल्याने त्यांना संघर्षाची सवय आहे सुरुवातीला इंग्रजांशी केलेला संघर्ष आणि त्यानंतर अन्य काही संघर्ष हे अख्ख्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे निश्चितच या संघर्षातून काँग्रेस बाहेर पडेल.
ते म्हणाले, राहुल गांधी काँग्रेस साठी आशादायी ठरेल आहेत. त्यांचे देशप्रेम व देशासाठी परखड विचार लोकांना पटू लागले आहेत. काँग्रेसची विचारधारा घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राहुल गांधी हा चेहरा लोकांच्या पटलावर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले, नारायण राणे काँग्रेस मध्ये बारा वर्षे होते. ते सत्तेशिवाय जगू शकत नाही, आज ते आणि त्यांचे पुत्र ज्याप्रमाणे खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे. यातून त्यांची पातळी दिसून येते एकूणच त्यांचे बोलणे हे अशोभनीय असून एक प्रकारे हा कोकणचा अपमानच म्हणावा लागेल तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे हे ज्याप्रमाणे हिंदुत्वावर बोलत आहे ते पाहता समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाने त्यांना मंत्रिमंडळात ठेवले आहे असे वाटते.
लाडक्या बहिणीच्या नावाखाली निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी जनतेला फसवण्याचे काम केले आहे गरज सरो वैद्य मरो अशी त्यांची नीती आहे आज कितीतरी लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभापासून त्याने बाद ठरवले आहे या योजनेसाठी कुठल्याच प्रकारची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केलेली नाही शिवाय उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असून तो पूर्णपणे चुकीचा आहे.
शक्तीपीठ ला काँग्रेसचा विरोधच!
काँग्रेस शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सुरुवातीपासूनच आहे मुळात १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गामुळे अनेक शेतकरी उध्वस्त होणार आहे. जैवविविधता, बागायती, शेतीचे नुकसान होणार आहे.या मार्गाची गरज नसताना हा महामार्ग केला जात आहे. रस्त्याच्या माध्यमातून भांडवलदारीचं कारस्थान आखल जात आहे म्हणूनच या प्रकल्पाला आमचा विरोध राहील असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.