नांदेड जिल्ह्यातील जनता आणि काँग्रेस पक्ष माझ्यासोबत असल्याने शंभर मोदी आले तरी मी अजिबात डगमगणार नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
बिलोली तालुक्यातल्या लोहगाव, आरळी, कुंडलवाडी, खतगाव, सगरोळी येथे जाहीर सभांद्वारे माजी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री असताना जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आपण प्रयत्न केले. विकासाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली. जिल्ह्यातल्या विकासप्रेमी जनतेने माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला. कोणतीही निवडणूक असो, जिल्ह्यातील जनता काँग्रेसच्या बाजूने उभी राहिली, याचा मला सार्थ अभिमान आहे. सध्या मोदी वारे वाहत असल्याची चर्चा आहे. पण अशा प्रकारचे कोणतेही वारे वाहत नाहीत. ते कृत्रिम वारे आहेत. जनतेवर विश्वास असल्याने असे शंभर मोदी आले तरी आपण डगमगणार नाही, असा दावा त्यांनी केला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न या बाबतीत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका नेहमीच जनतेच्या हिताची राहिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्य़ात दुष्काळाचे चटके बसत असताना जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही. सिंचनाचे प्रश्न कै. शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळेच सुटले. मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू झाली. त्यामुळे गरिबांना विनासायास उपचार मिळू लागले आहेत. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपण राजकारण केले नाही. त्यामुळे जनतेने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता काँग्रेसला भरघोस मतदान करावे, असे आवाहन केले.
बिलोली तालुक्यात माजी मुख्यमंत्र्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर, आमदार अमर राजूरकर, रावसाहेब अंतापूरकर, प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार, संभाजीराव धुळगंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे बापुराव गजभारे यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकत्रे व स्थानिक पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाल्याने काँग्रेसच्या नेत्यांची चिंता दूर झाली आहे.
शंभर मोदी आले तरी डगमगणार नाही – चव्हाण
नांदेड जिल्ह्यातील जनता आणि काँग्रेस पक्ष माझ्यासोबत असल्याने शंभर मोदी आले तरी मी अजिबात डगमगणार नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
First published on: 07-04-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party public with me ashok chavan nanded