काँग्रेसचे राष्ट्रवादीला आव्हान
दापोली नगरपंचायत निवडणुकीत आतापर्यंत आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेसने यंदा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीही या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनीही आक्रमक पवित्रा घेत आघाडी तोडण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.
दापोली नगरपंचायत निवडणुकीत गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी यशस्वी ठरली होती. त्यांना प्रथमच सर्वाधिक म्हणजे सात जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे एकमेव अब्दुल सत्तार मुजावर निवडून आले होते. तर उर्वरित सहा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. त्याच बळावर आघाडीने पहिल्या अडिच वर्षांत सत्तेवर कब्जा मिळवला होता.
पण त्यावेळी काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जाणारे प्रभाग राष्ट्रवादीने स्वतच्या ताब्यात घेतल्याने पक्षाची गळचेपी झाली, असा निष्कर्ष आता काढण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसवर लादलेला जागावाटपाचा एकतर्फी निर्णय यंदा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या बठकीत घेण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या सतरा प्रभागांमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून आगामी नगरपंचायतनिवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारीकरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दापोलीच्या मेहेंदळे सभागृहात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची नुकतीच बठक झाली. यावेळी प्रभारी तालुकाध्यक्ष वसंत मेहेंदळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीची काँग्रेसला गृहित धरण्याची मानसिकता आता खपवून घेतली जाणार नसल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटण्याची चिन्हे आणि मनसेचा प्रभाव अशा राजकीय परिस्थितीत हा निर्णय पक्षाला स्वतचे आस्तित्व सिद्ध करण्यासाठीफायदेशीर ठरणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या निर्णयामागे राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा हेतू असला तरी राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार संजय कदम यांनी काँग्रेसचे हे आव्हान स्वीकारले असल्याची चर्चा सध्या दापोलीत सुरू आहे.