नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी दोन ऐवजी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याची सूचना एका गटाने अलीकडे केल्यानंतर पक्षाच्या उत्तर विभागाच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष कायम ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला. सुमारे सव्वा वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्ष सोडल्यांनतर तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी तेव्हाची जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली होती. नंतर पक्ष संघटनेत उत्तर व दक्षिण असे दोन विभाग करून अनुक्रमे बी.आर.कदम आणि हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष करण्यात आले. पक्षातील हे ‘प्रभारीराज’ अद्याप कायम आहे. पण एकंदर परिस्थितीचा विचार करून खासदारांच्या गटाने पक्षश्रेष्ठींकडे ग्रामीण भागासाठी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याची सूचना केल्यानंतर त्यास उत्तर विभागातील पदाधिकार्यांनी विरोध केला आहे.
प्रदेश काँग्रेसने नांदेड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून खा.डॉ.कल्याण काळे यांची नियुक्ती केली असून ते येत्या काही दिवसांत नांदेडला येऊन सर्वांशी चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांनी रविवारी दुपारी पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ‘दोन जिल्हाध्यक्ष हवेतच’ असा सूर आळवण्यात आला.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली. चार माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. अशा स्थितीत पक्ष सावरण्याचे आव्हान विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण यांच्यापुढे आहे. जिल्ह्यात १६ तालुके असून पक्ष संघटन बळकट करायचे असेल, तर दोन जिल्हाध्यक्षांच्या सध्याच्या रचनेला खासदारांनी पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षा बैठकीतून व्यक्त झाली.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पुढील दोन दिवसांत वेगवेगळ्या बैठका होणार आहेत. पक्षाचे प्रभारी मुंबईमध्ये येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पदाधिकारी मुंबईला जात आहेत. त्यापूर्वी स्थानिक पातळीवरील एका गटाने रविवारी बैठकीच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली. पण या बैठकीसंदर्भात माध्यमांकडे कोणतीही माहिती कळविण्यात आली नाही. वरील बैठकीला डॉ.रेखा चव्हाण, प्रताप देशमुख बारडकर, सुरेंद्र घोडजकर, बालाजी चव्हाण, विठ्ठल पावडे, राजेश पावडे, सुनील वानखेडे, प्रफुल्ल सावंत, संदीपकुमार देशमुख बारडकर, गोविंदबाबा गौड यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या बैठकीतील ठळक मुद्दे
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले, त्यांना जिल्हाध्यक्षपदी संधी नको.
उत्तर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांची पदावर कायम राहण्याची इच्छा.
पक्षाच्या दक्षिण विभागातील तीन तालुकाध्यक्ष पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कोणावर, अशी विचारणा.