छत्रपती संभाजीनगर: पैसा आणि सत्तेपायी हत्या करुन हसणारा समाज आपण घडवला आहे. त्यामुळे धनंजय देशमुख कुटुंबाची माफी मागायला हवी. घरावर एवढे मोठे संकट कोसळले तरी धनंजय देशमुख आणि त्यांच्या मुलींनी कधीही विवेक सोडला नाही. चुकीची विधाने केली नाहीत. कोणत्याही जातीला दोषी धरले नाही. त्यांनी जपलेला हा सद्भाव वाढीस लागावा , यासाठी ही मस्साजोग ते बीड अशी यात्रा आयोजित केल्याचे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी हत्या हा सद्भावनेचा बळी होता. त्यामुळे त्यांना शहीद मानून पुढील काळात काम करावे लागले, असे म्हणत सपकाळ यांनी व्देष, मत्सर पसरविणाऱ्यांचा निषेध केला. काही जण जाणीवपूर्वक हेतूत: व्देष पसरवत असल्याचे सांगत कॉग्रेस पक्ष भारत जोडो याच भूमिकेत असल्याचे यात्रा सुरू करताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.यात्रेच्या सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. नामदेव शास्त्री यांच्याशी त्यांनी बदलेल्या भूमिकेबाबत चर्चा झाली का, असे विचारले असता ‘ सद्भभावना निर्माण करण्याच्या हेतू असल्याने त्यांच्याशीही त्याच पद्धतीने चर्चा झाल्याचे सांगितले. सपकाळ यांनी नारायण गडाचेही दर्शन घेतले. रात्री त्यांनी सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी उभ्या केलेल्या ’इन्फट इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेवर मुक्काम केला. या यात्रेत तिरंगा झेंडा हाती घेऊन अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये रजनी पाटील, अतुल लोंढे, कुणाल चौधरी आदी नेते सहभागी झाले होते. कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह झालेला हा कार्यक्रम बीडमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास उपयोगी पडेल असे सांगण्यात येत आहे.
सद्भावना यात्रेवर आशिष शेलारांची टीका
कॉग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या घरांच्या दरम्यान यात्रा काढायला पाहिजे होत्या. त्यांच्या पक्षात सद् भावनचे गरज आहे. प्रश्न जर मस्साजोगचा असेल तर तो विषय संवेदनशील आहे. त्यात सरकारने लक्ष घातले आहे. हत्या प्रकरणात दोषाराेप दाखल झाले आहे. त्यामुळे त्यात अन्य कोणी पडू नये, असा सल्ला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिला.