अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी गुरूवारी ( १ जून ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल झाले. अवघ्या काही वेळताच गौतम अदाणीही ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शरद पवार यांचा वेगळा पक्ष आहे, ते काँग्रेस पक्षाचे नाहीत. आम्ही भाजपाचा पराभव करण्यासाठी एकत्र आहोत. कोणाला भेटतात, त्यांचं मत काय असू शकतं, कोणत्या विचारांचं समर्थन करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. अदाणी शरद पवारांच्या घरी राहायला गेले, तरी आम्हाला विरोध करण्याची गरज नाही,” असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.
हेही वाचा : वाशीममध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पटणी यांना मोठा धक्का
“अदाणींना आमचा कोणताही व्यक्तीगत विरोध नाही. पण, ज्यापद्धतीने देश विकून त्यांना दिला जातोय. जनतेचे पैसे लुटून अदाणींना दिले जात आहेत. हे सर्व रेकॉर्डवर आले आहे. कोणाला व्यक्तीगत संबंध ठेवायचे असतील, तर ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे,” असेही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : ‘या’ खासदाराचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले, नेमकं काय घडलं वाचा!
शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे. “गौतम अदाणी अनेक वेळा शरद पवारांची भेट घेत असतात. त्यांची ओळख आहे. त्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील, काही गोष्टी मांडायच्या असतील, त्यासाठी ते भेटले असावेत. कदाचित मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने दिलेल्या निकालाबाबत काही बोलायचं असेल. मला माहिती नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.