भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी केलेल्या शिवसना भवन फोडण्यासंदर्भातल्या वक्तव्यावरून शिवसनेकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील, राजन साळवी अशा अनेक शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून देखील या मुद्द्यावर प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावरून भाजपाला परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. लाड यांचं विधान हा भाजपाच्या प्रवृत्तीचाच दाखला आहे, असं नाना पटोले म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. “भारतीय जनता पार्टीची जी प्रवृत्ती आहे, ते त्यांचे शब्द आहेत. त्या प्रवृत्तीमध्ये आम्ही जात नाही. आम्ही गांधी विचाराचे लोक आहोत, त्यामुळे ते कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत. हे मला सांगायची गरज नाही. ते लोकांना माहिती आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
“काँग्रेस जासूसी करत नाही”
दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी पेगॅसस प्रकरणावरून देखील भाजपाला टोला लगावला. पूरग्रस्त पाहणी दौर्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवादाकडे कसे पाहता? असं विचारलं असता ते म्हणाले की, “काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही. काँग्रेस सरकार जासूसी करत नाही. ते काम केंद्राचं आहे”, असं ते म्हणाले.
“तुम्ही सेना भवन फोडा, आम्ही…”, शिवसेनेनं प्रसाद लाड यांना सुनावलं!
“आता मोदी काय मदत देतात ते पाहू”
“पूरग्रस्तांसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा आहे ते काय मदत करतात ते पाहू, वादळाच्या वेळेस त्यांनी गुजरातला भेट दिली मात्र महाराष्ट्राला भेट दिलेला नाही. तसेच तिथे मदत दिली. पण आपल्याला मदत दिली नाही. त्यामुळे आता पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील हे पाहावे लागणार आहे”, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.
प्रसाद लाड यांची दिलगिरी!
दरम्यान, शनिवारी “वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू”, असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ जारी केला आहे. “शिवसेना प्रमुख किंवा त्यांनी बांधलेल्या वास्तूचा मला अनादर करायचा नव्हता. कुणाचं मन दुखावलं असेल, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”, असं प्रसाद लाड या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.