सांगली : सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतून ठाकरे शिवसेनेचा आग्रह कायम राहणार असेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून दबाव  वाढत आहे. सोमवारी सकाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांगली कॉंग्रेसचीच असा निर्वाळा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी दिल्याने ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या जागेवर हक्क सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगलीच्या जागेचा तिढा यामुळे अद्याप सुटलेला नाही. ठाकरे शिवसेनेच्यावतीने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला असून त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशावेळी प्रचार शुभारंभाला उद्धव  ठाकरे यांनी येण्याचे कबूल केले आहे. दि.  २१  मार्च रोजी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ठाकरे यांची जाहीर सभा मिरजेत आयोजित करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचे नेतेही आक्रमक झाले असून गेली तीन महिने काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगलीची जागा जर ठाकरे शिवसेनेला दिली गेली तर मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय उरणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. सांगलीची जागा ठाकरे शिवसेनेला की काँग्रेसला याबाबत संभ्रम कायम आहे‌.

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

हेही वाचा – राणांसमोर घटक पक्षांची एकजूट राखण्‍याचे आव्‍हान

आज सकाळी आमदार कदम यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष खरगे यांची भेट घेऊन सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा प्रबळ असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress pressure for a friendly fight from the alliance for sangli ssb