गेल्या महिन्याभरापासून देशभरात चर्चेत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे. तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा जीव वाचला असता अशी टीका आता भाजपाकडून महाविकास आघाडीवर केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत. महाराष्ट्र भाजपानं शुक्रवारी ट्विटर हँडलवरून केलेल्या टीकेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र भाजपाचा ट्विटरवरून गंभीर आरोप!

भाजपाकडून श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर गभीर आरोप करण्यात आले आहेत. श्रद्धाच्या खूनाला आफताबइतकीच मविआही जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. “लव्ह जिहाद’ला बळकटी देण्याचे महाविकास आघाडीचे काम!
श्रद्धा वालकरने पाठविलेल्या तक्रार स्वरूपी चिठ्ठीची मविआ आणि पोलिस विभागाने योग्य वेळी दखल घेतली असती तर आज श्रद्धा त्या नराधमाच्या तावडीतून सुटली असती. श्रद्धाच्या खूनाला आफताब इतकीच महाविकास आघाडीही जबाबदार आहे!” असा दावा महाराष्ट्र भाजपानं ट्विटरवर केला आहे. यासह भाजपानं एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

काँग्रेसचं प्रत्युत्तर!

दरम्यान, एकीकडे भाजपानं गंभीर आरोप केला असताना दुसरीकडे काँग्रेसकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या भाजपा महाराष्ट्रच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देणारं ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी लोढा कमिटीच्या अहवालाचाही उल्लेख केला आहे.

Shraddha Walker murder case: महरौली जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच; डीएनए चाचणीतून निष्कर्ष

“श्रद्धाची हत्या झाली दिल्लीत! तिचे तुकडे करून तो नराधम दिल्लीजवळच्या जंगलात फेकत असताना मोदी सरकार आणि दिल्ली पोलीस आबाधुबी आणि गोट्या खेळत होते. नाही का? बरं ते लोढा कमिटीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा उल्लेख का नाही बरं?” असा खोचक सवाल सचिन सावंत यांनी या ट्वीटमधून केला आहे.

दरम्यान, श्रद्धा वालकर प्रकरणात दोनच दिवसांपूर्वी पोलिसांना दिल्लीजवळच्या जंगलात मृतदेहाचे काही तुकडे सापडले असून त्यांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. त्यामुळे हे तुकडे श्रद्धाच्याच मृतदेहाचे असल्याचं निश्चित झालं आहे. मात्र, अजूनही मृतदेहाचे इतर तुकडे आणि श्रद्धाचं शिर पोलीस शोधत आहेत.