राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राज्यातल्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईथल्या महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यावरून आता काँग्रेसकडून देखील निशाणा साधण्यात आला असून फडणवीसांच्या त्या विधानावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतल्या या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक, भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांना उल्लेखून हे विधान केल्यानंतर ते व्हायरल होऊ लागलं आहे. “गणेश नाईक, मंदा म्हात्रे, पाटील साहेब तुमच्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावरून काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. “कल्पनेतही नसताना मविआ सरकार स्थापन झाले हा झटका मोठा होता याची जाणीव आहे. मानसिक धक्क्यातून अनेकदा अशा प्रकारची लक्षणे उद्भवू शकतात. रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात म्हणे! लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे. आधीच दोन वर्षे अंगावर काढली आहेत, काळजी घ्यावी!” असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे – देवेंद्र फडणवीस

त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावरून आता राज्याच्या राजकारणात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sachin sawant mocks devendra fadnavis statement on chief minister post pmw