राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज नव्या सरकारची पहिलीच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय हा पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा होता. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यावरून काँग्रेसनं खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, यासंदर्भात भाजपानंच केलेल्या जुन्या मागणीचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयासंदर्भात माहिती दिली. “युतीच्या सरकारने ठरवलं आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे आजपासून पेट्रोलचे दर पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेसनं टीका करताना भाजपाच्याच एका जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलवरील राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा कर कमी करून ५० टक्क्यांनी किमती कमी करण्याची मागणी भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्या परिषदेतील व्हिडीओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत राज्य सरकारला खोचक सवाल केला आहे.
Petrol Diesel Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
“आज शिंदे-फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५ रूपये आणि ३ रुपये एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे एकूण वॅटवर ५०% कपात करा म्हणजे एकूण पेट्रोल वरील ३२.५५ रुपयांपैकी १६.२८ रुपये व डिझेल वरील २२.३७ रुपयांपैकी ११.१९ रुपये कमी करा अशी भाजपाची मागणी होती. त्याचे काय झाले?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. या ट्वीटसोबत सचिन सावंत यांनी केशव उपाध्ये यांचा जुना पत्रकार परिषदेतला व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यात उपाध्ये ५० टक्के दरकपातीची मागणी करताना दिसत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी गुजरात आणि कर्नाटकसोबत महाराष्ट्रातील दरांची तुलना केली आहे. “केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा १० रुपयांनी जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे, असा आरोप फडणवीस करत होते. अजूनही महाराष्ट्राचा कर केंद्रापेक्षा जास्त आहेच. त्याचे काय? अजूनही गुजरात व कर्नाटक मधील दर फार कमी आहेत. त्याचे काय? जवाब दो”, असं सचिन सावंत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
पेट्रोलचे दर ५ रुपये आणि डिझेलचे दर ३ रुपये प्रतिलिटर कमी करण्याचा निर्णय
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार
अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार
आणीबाआणीबाणीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याची योजना पुन्हा सुरु करणार