गेल्या दोन दिवसांपासून राज्यात फोन उचलल्यानंतर त्यावर काय म्हणावं? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणीभूत ठरली ती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली एक घोषणा! राज्याच्या शासकीय कार्यालयांमध्ये फोन उचलल्यानंतर त्यावर सर्व शासकीय कर्मचारी ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यावर विरोधकांनी खोचक टीका करायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निर्णयाची घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍या काळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकिमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लिंग चेतविले”, असं मुनगंटीवार यासंदर्भात बोलताना म्हणाले होते.

काँग्रेसचा खोचक सवाल!

दरम्यान, यावरून एकीकडे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे काँग्रेसकडून या मुद्द्यावर खोचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमधून राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला खोचक शब्दांत सवाल केला आहे.

हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्यास विरोध म्हणजे संविधानाला विरोध – मुनगंटीवार

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये मराठीतील अशा काही शब्दांचा संदर्भ दिला आहे, जे इतर भाषांमधून मराठीत घेण्यात आले आहेत. “‘हॅलो’ इंग्रजी म्हणून आवडत नाही, मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार? पलंगावर कसे झोपणार? खुर्ची, पलंग फारसी शब्द आहेत. बटाटा, कोबी, हापूस, पपई, पेरू, अननस, बिस्कीट खाऊ नका, पोर्तुगीज आहेत ते. सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्दही फारसी आहेत”, असं सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हॅलोऐवजी वंदे मातरम् ला विरोध करणं, म्हणजे संविधानालाच विरोध करण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.