नेहमीच अवर्षणप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ासह सहा जिल्ह्य़ांतील ३१ तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याच्या मुद्यावर दाखविलेली उदासीनता व त्यामुळे राष्ट्रवादीविषयी पसरत चाललेली सार्वत्रिक नकारात्मक भावना वाढीला लागली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ात राष्ट्रवादीविषयी नकारात्मक होत असलेल्या जनभावनेचा राजकीय लाभ घेण्याचे धोरण काँग्रेसने आखल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे २००४ साली उपमुख्यमंत्री असताना त्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला होता. परंतु, नंतर तो बासनात गुंडाळला गेला. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांंत राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणात मोहिते-पाटील गट निष्प्रभ करण्यात आला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा मुद्दा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुर्लक्षित होऊनसुध्दा मोहिते-पाटील यांनी या प्रकल्पाबाबत सतत पाठपुरावा चालविला आहे. उजनी धरणावर असलेल्या सध्याच्या लाभक्षेत्रास पाणी पुरत नाही व मराठवाडय़ासह इतर योजनांना द्यावयाचे ५० टीएमसी पाणी हे कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून घ्यावयाचे आहे. परंतु, ही योजनेची  व पर्यायाने मोहिते-पाटील यांची राष्ट्रवादीकडून हेटाळणी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर अखेर मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन थेट त्यांनाच साकडे घातले. या प्रकल्पासाठी संपूर्ण जिल्ह्य़ातून गोळा झालेल्या तब्बल ८ लाख ४३ हजार ७९१ सह्य़ांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. सुदैवाने उजनी धरणात सुमारे १५ टीएमसी गाळमिश्रीत वाळूचा साठा सापडला असून, या वाळूचा लिलाव केल्यास त्यातून कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळणार आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील मतदारांची संख्या सुमारे २२ लाखांच्या घरात आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी गोळा झालेल्या सह्य़ांची संख्या विचारात घेता ती एकूण मतदारांच्या ३९ टक्के इतकी लक्षणीय आहे.
या योजनेला दुसरा पर्याय नसल्याने ती पूर्ण करावीच लागेल. त्यासाठी टप्प्या-टप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनन देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या मुद्यासह सोलापूर जिल्ह्य़ातील पाण्याच्या प्रश्नावर एकूण राष्ट्रवादीविषयी वाढत चाललेल्या नाराजीचा राजकीय लाभ घेण्यासाठी काँग्रेसने पावले आखायला सुरूवात केल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्र्यांची आस्था
पश्चिम महाराष्ट्रात-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी राष्ट्रवादीचा दारूण पराभव करून एकहाती सत्ता मिळविल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचा बंदोबस्त करण्याविषयी काँग्रेसने पावले टाकायला सुरूवात केल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली आस्था हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.

Story img Loader