महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आणि पुढे नेण्याच्या दृष्टीने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संघटित होऊन, व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून सध्याच्या काळात राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे यांनी केले.
गुरुवारी सायंकाळी लोणी येथे पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. पुन्हा निवडणुका लढवण्यास कोणतेही आमदार तयार नाहीत. कारण नुकत्याच झालेल्या निवडणुका मोठय़ा विचित्र पद्धतीने झाल्या. पण राज्याच्या हिताच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने शांत राहणे हे शहाणपणाचे ठरेल. कारण सर्वच आमदारांना पुन्हा निवडणुकींना सामोरे जाणे अवघड आहे. निवडणूक लढविणे म्हणजे मोठे दिव्य स्वप्न आहे. काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता महाराष्ट्र व आमदारांना वेठीस धरू नये. आता आवडीनिवडीचा प्रश्न नाही. हा प्रश्न महाराष्ट्राला स्थिर आणि पुढे नेण्याच्या दृष्टीने काही काळ तरी राज्यातील सरकारला मदत करणारे ठरेल. काँग्रेस पक्षाने चुकीच्या प्रतिष्ठांमागे धावू नये असे सांगताना विखे म्हणाले, की सर्वच काँग्रेस नेत्यांना माझी व्यक्तिगत विनंती आहे, की यात पक्षहित, राज्य व आमदारांचे हित आहे. यात कुठेही पक्षाला कमीपणा नाही. पक्षाला जो कमीपणा यायचा होता तो या निवडणुकीत येऊन गेला.
येथून पुढच्या काळात सगळय़ांनी चांगले संघटनात्मक काम केले तर पक्ष बळकट होऊ शकतो, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, काँग्रेस पक्ष दुबळा, खिळखिळा झाला. दुर्दैवाने राज्यात काँग्रेस पक्षाला नेतृत्व नाही. अशा परिस्थितीत नेतेमंडळींनी डोके शांत ठेवावे. मला याची कल्पना आहे, की माझे वक्तव्य काही नेत्यांना आवडणार नाही. परंतु, नेतेमंडळींनी स्वत:चे हितसंबंध बाजूला ठेवणे आवश्यक आहे. निवडणुकीत कुणाच्या चुका झाल्या, का झाल्या, कोणी पक्ष दुबळा केला, शासनात कोणी चुका केल्या, याची यथावकाश चर्चा करावी, त्यामुळे सध्या काँग्रेस नेत्यांना आपली विनंती आहे, की व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून सध्याच्या काळात भाजप सरकारला पाठिंबा देणे योग्य व शहाणपणाचे आहे. अन्यथा हात दाखवून अवलक्षण करू नये. तसेच माझ्या वक्तव्याचे काही नेत्यांना आश्यर्य वाटेल, परंतु मी हे वक्तव्य विचारपूर्वक व राज्याच्या हिताच्या दृष्टीने केले आहे, असे ते म्हणाले.
देशासह सर्वच पक्ष तसेच समाजाची पार वाताहत झाली आहे. त्यामुळे सर्वानी संघटित होऊन समाजहिताकडे लक्ष द्यावे, असे विनंतिवजा आवाहन विखे यांनी केले.

Story img Loader