माजी मुख्यमंत्री व पक्षाचे वरीष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गेली ४८ वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या नावापुढे आता भाजपा नेते असं पद लागलं आहे. शिवाय आता भाजपाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारीही मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर चर्चा झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी अशोक चव्हाणांना एक मूलभूत प्रश्न केला आहे.
अशोक चव्हाण यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना काँग्रेस सोडण्याचं कारण विचारलं असता त्यावर स्पष्ट उत्तर देणं त्यांनी टाळलं. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्यामागे नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी यामागे ईडी किंवा श्वेतपत्रिकेतील आदर्श घोटाळ्याचा उल्लेख कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावर परखड भाष्य करण्यात आलं.
“अशोक चव्हाण एकटेच जातायत”
अशोक चव्हाण यांच्यासमवेत इतरही काही आमदार, नांदेडमधील नगरसेवक पक्ष सोडून जात असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांनी ही चर्चा फेटाळून लावली. “मी एक स्पष्ट सांगतोय. अशोक चव्हाण यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसमधून एकही कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही. अशोक चव्हाण एकटेच पक्ष सोडून जात आहेत. जो कुणी पक्ष सोडून जाईल, त्याच्यासोबत कार्यकर्ताही राहणार नाही, महाराष्ट्रातील जनताही राहणार नाही”, असं चेन्नीथला म्हणाले.
आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भाजपा प्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले, “हा राजकीय…”
“परवा दुपारी २ वाजेपर्यंत आमच्याबरोबर वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत अशोक चव्हाण होते. पण त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन दिवसांपूर्वीच ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना भेटले. दिल्लीतील अनेक नेत्यांशी चर्चा केली. परत येऊन आमच्याबरोबर मीटिंगमध्ये बसले होते”, असंही ते म्हणाले.
अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली?
दरम्यान, काँग्रेसकडून अशोक चव्हाणांच्या या निर्णयावर मूलभूत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. “त्यांनी काँग्रेस का सोडली? हे त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यांच्याकडे याचं उत्तर नाहीये. काँग्रेसचं धोरण चुकीचं आहे का? काँग्रेसनं त्यांच्यावर काय अन्याय केला आहे? एक राजकीय नेता म्हणून त्यांनी हे स्पष्ट करायला हवं. काँग्रेसनं त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री बनवलं. १५ वर्षं ते काँग्रेसच्या काळात मंत्री होते. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षही होते. पक्षानं त्यांना सगळं दिलं. नेता बनवलं. तरीही ते पक्ष सोडून जात आहेत”, अशा शब्दांत चेन्नीथला यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
“आम्ही राजकारणात विचारसरणीने काम करणारे लोक आहोत. एकही काँग्रेसवाला त्यांच्यासोबत जाणार नाही. आयाराम-गयाराम कुणालाही आवडत नाहीत. त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांच्यावर ईडीचा दबाव आहे का? सीबीआयचा दबाव आहे का?”, असं चेन्नीथला यांनी नमूद केलं. “ज्या व्यक्तीने एका पक्षात ४८ वर्षं काम केलं, मोठमोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळली, ती व्यक्ती पक्ष का सोडतेय हे सांगण्याची जबाबदारी असते ना? नांदेडचे सर्व नगरसेवक इथे आले होते. त्यांनाही अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं नाही”, असंही चेन्नीथला म्हणाले.