महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात चौफेर टीका केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत, त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायची लायकी नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंच्या या टीकेला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज आपण मेंदूहीन राज ठाकरेंना बोलताना पाहिलं, अशी खोचक टीका अतुल लोंढे यांनी केली.
राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अतुल लोंढे यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, आज आपण मेंदूहीन राज ठाकरेंना दुसऱ्यांची लायकी आणि दुसऱ्यांच्या मेंदूबद्दल बोलताना पाहिलं. राज ठाकरे, तुम्ही आज थोर महापुरुषांवर होणारी चिखलफेक थांबवा, असं म्हटलं, हे आम्हालाही मान्य आहे. पण तुम्ही ज्या महापुरुषांची नावं घेऊन देश पुढे घेऊन जाण्याची भाषा करत आहात, त्या महापुरुषांनी धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केलं आहे. माफी मागून बाहेर आल्यानंतर त्यांनी देशाचा स्वातंत्र्यलढा चालवला नाही. त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिंद्धांत मांडला. इंग्रजांशी जवळीक साधली. ते स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात उभे राहिले. असा आदर्श तुम्ही ठेवणार असाल तर पुढच्या पिढीला काय देणार आहात? हे महत्त्वाचं आहे.”
“तुम्ही राहुल गांधींचा विषय काढला. राहुल गांधी त्या घराण्यातले आहेत, ज्यांनी कधीही माफी मागितली नाही. प्रसंगी या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान दिलं. तुम्ही त्यांचा मेंदू काढला जे देशाला जोडायला निघाले आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच तुम्हाला आज हे सुचत आहे. आज तुम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह सगळ्या महापुरुषांबद्दल बोललात. राहुल गांधीनी ‘भारत जोडो’च्या माध्यमातून जो प्रेमाचा संदेश दिला आहे, त्याचा हा परिणाम आहे. आज तुम्ही भारताला राज्यांचा संघ बोललात, ही भाषा राहुल गांधींची आहे. त्यामुळे राज ठाकरे आता तुम्हीच सांगा कुणाला मेंदू आहे आणि कुणाला नाही? असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “त्या दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का? सावरकर यांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” अशी टीका राज ठाकरेंनी केली.