शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे गायरान वाटप प्रकरण आणि सिल्लोड कृषी महोत्सवासाठी गोळा केलेली देणगी यावरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील विरोधक या विषयांवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच जोपर्यंत अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत हा विषय सोडणार नाही, असा पवित्रा देखील विरोधकांनी घेतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले असून ज्या हिंदुत्त्वासाठी सत्तार शिंदे गटात गेले, त्यावरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार त्यात राज्यमंत्री म्हणून काम करत होते. जून २०२२ मध्ये राज्यभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर चक्र फिरली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार सरकारमधून बाहेर पडले. आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत जात असल्याचे यावेळी प्रत्येक आमदार सांगत होता. भाजप हा हिंदुत्ववादी शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे, त्यामुळेच काँग्रेस – राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिला. ज्यात अब्दुल सत्तार राज्यमंत्री वरुन थेट कॅबिनेट मंत्री झाले.
यावर बोलत असताना अतुल लोंढे म्हणाले, “अवैध पद्धतीने आलेले सरकार अवैध कामं करत आहे. हे असंवैधानिक सरकार असून मंत्री अब्दुल सत्तार हिंदुत्वासाठी गेले आणि गोमातेचेच गायरान खाऊन बसले.”, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
“एकीकडे गाईचे गायरान खाऊन टाकायचं. तिकडे महोत्सवाच्या नावाने वसूली करायची आणि तडफडणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम कृषिमंत्री अब्दुल सत्तार करत आहेत. अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबिन, कापूस पिक वाया गेले, त्याची यांना चिंता नाही. शेतकरी मरतो की जगतो, ते पाहायला यांना वेळ नाही. युवक बेरोजगारीने नाडला गेलाय, एमपीएससीचा बट्ट्याबोळ झालाय, त्याचीही चिंता नाही. यांना चिंता आहे ती फक्त आपली वसूली कशी होणार?’, असेही अतुल लोंढे म्हणाले.
हे ही वाचा >> “भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या..,” विरोधकांचे अभिनव आंदोलन
हेच का तुमचे पारदर्शक सरकार?
पुढे अतुल लोंढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ८२ कोटींची जमिन २ कोटीला दिल्याचा आरोप आहे. त्यांना वाचविण्यासाठी फडणवीस पुढे येतात. अब्दुल सत्तार यांना वाचविण्यासाठी संपुर्ण भाजपचे नेते सर्वकाही पणाला लावतात. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन आम्ही कसे पारदर्शक आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. या सरकारचा खरा चेहरा समोर आलेला असून त्यांना एकही दिवस सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही.