काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केली. यानंतर काँग्रेसने आक्रमक होत राज्यभरात मोर्चे, निदर्शने, आंदोलने करीत या कारवाईचा निषेध केला. विदर्भातील दहाही जिल्ह्यात काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा गोंदियात ना आंदोलन करण्यात आले, ना मोर्चा निघाला. निवडक काँग्रेस पदाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोकळे झाले.
हेही वाचा >>>वर्धा: देशभरातील अडीच हजारावर रेल्वे थांबे बंद; रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
माजी आमदार गोपालदास अग्रवाल काँग्रेस सोडून भाजपावासी झाले तेव्हापासून गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला आलेली मरगळ आजही कायम आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे केवळ पदाधिकारीच दिसले. कार्यकर्ते आंदोलनाकडे पाठ फिरवत असल्याचे गेल्या तीन वर्षातील चित्र आहे. आपल्या आक्रमक स्वभावामुळे राज्यातील राजकारणात ठसा उमटवलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच गृहजिल्ह्यात काँग्रेसला आलेली मरगळ चिंताजनक आहे. या संदर्भात काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड यांना विचारले असता, आम्ही शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. शनिवारी दुपारी ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.