Nana Patole : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र, विरोधकांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील लोकांनी बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मारकडवाडी गावाला दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील भेट दिली होती. त्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलं. ‘बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असताल तर उत्तमराव जानकर यांच्यासह मी आणि आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत’, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
“काही लोक मारकडवाडीत आले आणि राजीनामे द्यावेत म्हणून बडबडून गेले आहेत. आता निवडणूक आयोगही त्यांचीच कठपुतली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सांगावं की पुढच्या निवडणुका बॅलेटवर घेऊ. मग उत्तमराव जानकर यांच्यासह मी आणि आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत. बॅलेटपेपरनुसार पुढे गेलं पाहिजे. मी एक लाख मताधिक्यांनी निवडून आलो असतो. मात्र, माझं मतदान २०८ वर आणून ठेवलं. हे आम्हालाही कळायला तयार नाही. तुमची परिस्थिती जशी आहे तशी आमचीही आहे”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
हेही वाचा : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
“मी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की तुमच्याकडे एक व्यवस्था आहे. मग कुठे-कुठे मतदान झालं, त्याचे फुटेज आम्हाला द्या. अद्याप आम्हाला निवडणूक आयोगाने कोणतेही फुटेज दिले नाही. आता अजूनही हे (भाजपा) चिमटे घेऊन पाहतात की खरंच निवडून आलो का? आता लोकांच्या मनात शंका आहेत. कारण आपल्याला आपण दिलेलं मत समजून घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली. त्यानंतर जनतेने आवाज उचलला. हा आवाज कोणत्याही राजकीय पक्षाने उचललेला नाही”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
‘गुन्हे तातडीने मागे घ्या’
“मारकडवाडी गावातील ज्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे तातडीने मागे घेतले पाहिजेत, ही मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून जे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. हे तातडीने थांबलं पाहिजे. अन्यथा याचे परिणाम पुढच्या काळात वाईट होतील हे कोणालाही नाकारता येणार नाही”, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.