Nana Patole : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून राज्यभरात दौरे सुरु असून विविध मतदारसंघाचा आढावा घेत सभा, मेळावे घेतले जात आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमामधून पक्षाच्या संघटनेचा आढावा घेत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत काँग्रेसच्यावतीने सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल करत सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी शाळेची तोडफोड करत रेल्वे रोको आंदोलन केलं. दरम्यान, बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरच बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : Nana Patole : “…तर त्या नेत्याचं तिकीट कापणार”, गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर नाना पटोले संतापले

नाना पटोले काय म्हणाले?

“बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. ही घटना आज नाही तर १३ ऑगस्ट रोजी घडली. आता १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या इमारतीच्या नुतनीकरणाचं उद्धघाटन केलं. त्यावेळी या घटनेची कुजबुज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मग मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव होता? मग मुख्यमंत्री फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करत आहेत का?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

“बदलापूरची जनताच नाही तर महाराष्ट्रातील जनताही रस्त्यावर यायला लागली आहे. राज्यातील अनेक मुली गायब झाल्या, याबाबत आम्ही विधानसभेतही अनेकदा सरकारला प्रश्न विचारले. मात्र, सरकार यावर काहीही उत्तर देत नाही. आता बदलापूरची घटना समोर आलेली आहे. या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आपण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. या सरकारला आपण वठणीवर आणू. तसेच महाराष्ट्रात अशा प्रकारे अत्याचाराची घटना घडणार नाही, याची अद्दल या सरकारला घडवल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patole on badlapur school case and eknath shinde devendra fadnavis girish mahajan gkt