उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे अनिल देशमुख यांच्या रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दम असेल तर अनिल देशमुख प्रकरणात पुरावे द्यावेत”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
“आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्यासंदर्भात बोलताना त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आम्ही आमची भूमिकाही मांडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास ७ वर्ष गृहमंत्रीपद सांभाळलं आहे. मग जर त्यांच्याजवळ चुकीच्या कारवाया करणाऱ्यांचे रेकॉर्डिंग असतील तर त्यांनी ते लपवून का ठेवले? त्यांच्यामध्ये दम असेल तर कारवाई करावी”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“जर अनिल देशमुख यांची चुकी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा. पण अशा प्रकारे सत्तेचा अधिकार वापरून विरोधकांना धमकावण्याचं पाप देवेंद्र फडणवीस करत आहेत, हे आपण पाहिलं आहे. अनिल देशमुख जेव्हा जेलमधून बाहेर आले होते, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्यासाठी माझ्यावर दबाव होता. हे देशमुखांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. पण तेव्हाही देवेंद्र फडणवीस काहीही बोलले नाहीत”, असंही नाना पटोले म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे सर्व संशयास्पद वाटत आहे. आजच अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना काही फोटो दाखवले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांमध्ये दम असेल तर या गोष्टींची वास्तविकता महाराष्ट्रासमोर मांडली पाहिजे. हे त्यांचं कर्तव्य आहे, कारण ते राज्याच्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्यामुळे राज्याच्या जनतेला सत्तेता कळली पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले.