लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे तरूण नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपाची ऑफर मिळाली असल्याचे समोर आले आहे. या सर्व विषयांवर माध्यमांशी बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर सडकून टीका केली. “महाराष्ट्र भाजपापासून दूर चालला आहे, याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. यासाठी पंतप्रधान मोदी वारंवार राज्याचे दौरे करत आहेत. पण कितीही दौरे केले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुजाण असून भाजपाला यावेळी मत देणार नाही. त्यासाठीच महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या भाजपाप्रणीत सरकारने राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका अद्याप घेतलेल्या नाहीत. दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतलेली नाही. उच्च न्यायालयानेही याबाबतीत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही…”, मनोज जरांगेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले, “राज्यातलं वातावरण ढवळलं…”

मोदी महाराष्ट्रातून पराभूत होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीला उभे राहावे, असे विधान नितेश राणे यांनी नुकतेच केले आहे. यावर नाना पटोले यांना टिव्ही ९ वृत्तवाहिनीने प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातून निवडणुकीला उभे राहिले तरी ते पराभूत होतील. “भाजपाचा देव जरी महाराष्ट्रातून उभा राहिला तरी पराभूत होईल. आमचे देव प्रभू श्रीराम आहेत. पण भाजपाच्या लोकांसाठी त्यांचे दोन नेतेच देव आहेत. त्यांनी आपल्या राजकारणासाठी प्रभू श्रीरामालाही कमी दाखविण्याचा प्रयत्न केला”, असाही आरोप त्यांनी केला.

“भाजपा महाराष्ट्रात पराभूत होत असल्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. हेच भाजपाच्या पराभवाचे लक्षण आहे. आज एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात दिसले की, एका गाडीत महायुतीचे नेते मावत नव्हते. एकमेकांच्या मांडीवर बसण्याची नेत्यांवर वेळ आली. तरीही पक्षात आणखी नेते घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून होत आहे”, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

प्रणिती शिंदे भाजपामध्ये जाणार का? सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “ती स्वतंत्र, प्रगल्भ…”

तर अजित पवारांचा ७० हजार कोटींचा घोटाळा बाहेर येईल

८३ वर्षीय सुशीलकुमार शिंदेंना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, “वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो. राहुल गांधींची मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असताना काँग्रेसचा एक नेता शिंदे गटात गेला. अजूनही काँग्रेसचे नेते खेचण्याचा प्रयत्न होत असला तरी काँग्रेसवर त्याचा काहीही फायदा होणार नाही. जनता या नेत्यांना धडा शिकवेल, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, मागच्या काळात कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असेल किंवा विधानपरिषदेच्या निवडणुका असतील त्याठिकाणी भाजपाचा पराभव झालेला आहे. त्यामुळे वातावरण भाजपाच्या विरोधात आहे. तसेच लोकसभेच्या ४० जागांवर महायुतीचा पराभव होईल, असे सर्व्हेतून दिसत आहे, त्यामुळेच भाजपाचे नेते वारंवार राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याचा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patole slams ajit pawar on pm narendra modi age kvg