गेल्या जवळपास महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे. राज्य सरकार आणि थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून मागे न हटण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढतच असला, तरी राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना हे दोघेही मागे हटताना दिसत नाही. मात्र, या सगळ्याच्या पाठिशी भाजपा असून हा पक्ष आता विचलित झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.
नावा पटोले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपावर टीका केली आहे. त्यामध्ये सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनावर देखील त्यांनी राज्य सरकारच्या वतीने भूमिका मांडली. “एसटी कामगारांच्या बहुतांश मागण्या दिवाळीपूर्वी पूर्ण केल्या. करोना काळातही राज्य सरकारने त्यांचे पगार, टीए-डीए त्यांना दिले. पण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे. भाजपा फार डिस्टर्ब झाली आहे. त्यांनीच ही खेळी खेळलेली आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी सगळ्यांना यात पाडलं. परिणामी दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय झाली. एसटी कामगारांची दिवाळी अंधारात झाली”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
पटोलेंचा भाजपाला सवाल…
दरम्यान, नाना पटोले यांनी यावेळी भाजपाचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “आमचा भाजपाला सवाल आहे की राज्यात फडणवीसांचं सरकार होतं. तेव्हा मुनगंटीवार अर्थमंत्री होते. याविषयी भूमिका मांडणारे त्यांचे व्हिडीओ सगळ्यांनी पाहिले. तेव्हा त्यांना खासगीकरण हवं होतं. केंद्रात तुमचं सरकार असताना सगळ्याचं खासगीकरण तुम्ही करता आणि महाराष्ट्रात सरकारीकरणाच्या गोष्टी तुम्ही कशा करता? ही दुटप्पी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भूमिका राहील”, असं नाना पटोले म्हणाले.
फडणवीसांनी बोनसमध्येच जगावं!
दरम्यान, कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना “सत्ता मिळणार, नाही मिळणार हे विसरून जा, कामाा लागा, सत्ता मिळाली तर बोनस समजा” असं विधान केल्यासंदर्भात यावेळी पत्रकारांनी विचारणा करताच नाना पटोलेंनी फडणवीसांवर खोचक टोला लगावला. “फडणवीसांनी बोनसमध्येच जगावं. आमच्या मित्रानं दिवसा स्वप्न बघू नये. कितीही त्रास दिला, तरी मविआचं सरकार पुढची ५ वर्ष आणि त्यानंतरही राहील”, असं नाना पटोले म्हणाले.