Nana Patole : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून राज्यभरात दौरे सुरु असून विविध मतदारसंघाचा आढावा घेत सभा, मेळावे घेतले जात आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमामधून पक्षाच्या संघटनेचा आढावा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करत उमेदवारांची चाचपणी केली जात आहेत. यातच राज्यातील विविध प्रश्नांबाबतही भाष्य केलं जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
असे असतानाच आज मुंबईत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने नाना पटोले कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या या सद्भावना मेळाव्यात काही कार्यकर्ते काही नेत्यांचा नारा देत घोषणाबाजी करत होते. मात्र, यावर नाना पटोले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत सूचक इशारा दिला. “तुम्ही कोणत्याही नेत्याचा नारा दिला तर त्या नेत्याचं तिकीट आम्ही कट करू”, असं नाना पटोले यांनी म्हणताच कार्यकर्ते शांत झाले.
हेही वाचा : बदलापूरप्रकरणी राज्य सरकार अॅक्शन मोडवर; ‘ते’ तीन पोलीस अधिकारी निलंबित, कारण काय?
नेमकं काय घडलं?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने मुंबईत सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खाली बसण्याची आणि शांत राहण्याची विनंती केली. पण तरीही कार्यकर्ते घोषणाबाजी करतच राहिले. नाना पटोले यांनी सांगूनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे नाना पटोले यांनी भर कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली.
नाना पटोले म्हणाले, “या ठिकाणी कोणत्याही नेत्याचा नारा लावला तर त्या नेत्याचं तिकीट आम्ही कट करू. त्यामुळे आता तुम्ही शांत बसा. अजिबात गोंधळ करायचा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्तच्या या कार्यक्रमामध्ये जर कोणी गडबड आणि गोंधळ केला तर मी त्यांची नोंद घेणार आहे. आता अजिबात या ठिकाणी गडबड गोंधळ नसला पाहिजे. हे काय चाललंय?”, असा सवाल करत नाना पटोले कार्यकर्त्यांवर संतापले. पुढे बोलताना ते म्हणाले, “आता तुम्ही कोणत्याही नेत्याचा नारा दिला तर त्या नेत्याचं तिकीट आम्ही कट करू”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.