मोदी लाटेच्या ओसरत चाललेल्या प्रभावाचा फायदा घेत सेना-भाजप महायुतीला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी कोणती व्यूहरचना आखावी, केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील मोदी सरकारने केलेला जनतेचा भ्रमनिरास कसा जनतेसमोर मांडावा, केंद्र सरकारच्या धोरणाने वाढलेल्या महागाईमुळे जगणे कसे असहय केले, हे जनतेला कसे पटवून द्यावे आणि कांॅग्रेस सरकारने विकासाच्या केलेल्या योजना मतदारांपर्यत कशा पोहोचवाव्यात, याची रणनीती आखण्यात कॉंग्रेस जोमाने कामास लागली असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिले.
कांॅग्रेसच्या विभागीय मेळाव्यांच्या आयोजनांची माहिती देण्यासाठी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ठाकरे यांनी हे संकेत दिले. मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला करून ‘बुरे दिन आए है’ हे मतदारांना पटवून देणे, सेना-भाजप युती सरकारच्या वाईट दिवसांचा अनुभव पुन्हा घ्यायचा का, असा प्रश्न जनतेला विचारावा, महायुतीत असलेला मुख्यमंत्रीपदाचा वाद इत्यादी मुद्दे घेऊन कांॅग्रेस विधानसभा निवडणूक प्रचारात सर्व सामर्थ्यांसह उतरणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी लोकसत्ताला सांगितले. कांॅग्रेस कार्यकर्त्यांंनी घरोघरी जाऊन कांॅग्रेसची धोरणे व मोदींच्या केंद्र सरकारातील अपयश सांगण्याचे काम धडाक्याने करावे, असे आवाहनही प्रदेशाध्यक्षांनी केले.
महायुतीतील सेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आठवलेंचा आरपीआय आणि राष्ट्रीय समाज पार्टी यांच्यात आतापासूनच सुरू असलेले जागा वाटपाचे वाद या सवार्ंचा फायदा काँग्रेसला मिळावा, यासाठी निवडणूक रणनीती आखली जात असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले. विशेष हे की, लोकसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पकी २४४ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीला विधानसभेत १०० टक्के बहुमत मिळण्याची खात्री असतांना कांॅग्रेसही विजयाची प्रचंड आशा बाळगुन असल्याचे ठाकरे यांची देहबोली सांगत होती. कॉंग्रेसन पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर येथे आयोजित केलेल्या विभागीय मेळाव्यांना निमंत्रितांनाच बोलविले असूनही मिळालेला प्रचंड प्रतिसाद कॉंग्रेससाठी उत्साहवर्धक आहे. याच मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत दिशासुध्दा मिळाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणुकीत कांॅग्रेस-राष्ट्रवादी कांॅग्रेस आघाडीला २८८ पकी फक्त ४४ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉंग्रेस जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हातात निवडणुकीची सूत्रे राहणार असल्याच्या चच्रेने भाजपात आनंदाचे, तर कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरणही दिसत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर कॉंग्रेसची केंद्रावर हल्लाबोल रणनीती कशी राहते, याकडे कांॅग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कांॅग्रेसच्या रणनीतीची आपल्याला पर्वा नाही. राज्यातही लोकांना बदल हवा आहे. कांॅग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यांना महायुतीच न्याय देऊ शकते, याची खात्री झाली आहे.
जनता निवडणुकीची आतूरतेने वाट पाहत असून भाजपची पहिली उमेदवार यादी १५ ऑगस्टपूर्वी जाहीर होईल, असे भाजप नेते सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार संघांमध्ये महायुतीने आघाडी घेतली ते मतदारसंघ पुन्हा महायुतीच्याच पारडय़ात पडतील, असे सेना- भाजप युतीचे नेते विश्वासाने सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा