Congress Vijay Wadettiwar Slam Naresh Mhaske Reaction on Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याकरता महाराष्ट्र सराकरकडून प्रयत्न सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन श्रीनगर येथे दाखल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते नरेश म्हस्के यांचे विधान चर्चेत आले आहे. जम्मू-काश्मीरला गेलेल्या लोकांना परत घेऊन येण्याबाबत बोलताना तिथे रेल्वेने गेलेली लोकं पहिल्यांदा विमानात बसत आहेत अशा आशयाचे विधान म्हस्के यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या या विधानावर आता टीका होताना दिसत आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हस्के यांच्या विधानावर आक्षेप घेतला असून कोणी कसले घ्यावे याचे भान राहिले नसल्याचे ते म्हणाले आहेत. वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर मस्के यांच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच ते म्हणाले की, “महायुती सरकार मधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची आणि स्वत:च्या मार्केटिंगची स्पर्धा किती असावी? जे कधी विमानात बसले नाही त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला. ही वेळ काय, कोणी कधी कसले श्रेय घ्यायचे याचे भान राहिले नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्त्वाचे की विमान प्रवास? आणि ते केलं म्हणून पण श्रेय घ्यायचे?” असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पहलगाम मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले,काही अडकले आहे. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहचत आहे याची स्पर्धा झाली. गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी काश्मीर वारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे! किमान अशा घटनांमध्ये तरी स्वत:चे मार्केटिंग करणे सोडा.,” असे वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

म्हस्के काय म्हणाले होते?

काश्मीर येथून पर्यटकांना परत आणण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांबाबत बोलताना म्हस्के म्हणाले की, “एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकार्‍यांना प्रोत्साहन मिळालं, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले आणि एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. त्यांच्या खाण्याचे वांधे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं आणि ती लोकं पहिल्यांदा विमानात बसत आहेत, रेल्वेनी गेलेली लोकं आहेत. पहिल्यांदा विमानात बसवून त्यांना महाराष्ट्रात आणले जात आहे ”, असंही नरेश म्हस्के म्हणाले.