काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळप्रश्नी सरकारविरोधात एकत्रितपणे आक्रमक भूमिका स्वीकारली असली तरी विरोधी पक्षनेतेपदावरून त्यांच्यात रस्सीखेच सुरूच आहे. विरोधी पक्षनेत्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी उभय पक्षाच्या नेत्यांनी विधान परिषदेत केली आणि त्यास सत्ताधारी पक्षातर्फे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही पाठिंबा दिला.
पण विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्यासाठी विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची निवड जाहीर करण्यात विलंब होत असल्याचे समजते. दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा एकाच दिवशी करण्याचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दुष्काळावरील चर्चेच्या दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे २८ सदस्य असून हे पद संख्याबळाच्या आधारे दिले जाते, मग नेमकी अडचण काय आहे, अशी त्यांनी विचारणा केली. सभापतींनी तातडीने निर्णय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. काँग्रेसने या पदासाठी दावा करताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारला तटस्थ राहूून पाठिंबा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होऊ नये, त्यामुळे सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण जनतेच्या प्रश्नावर विरोधकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या दोघांनीही या पदावर पक्षाचा दावा असल्याचे सांगितले. त्यावर आपण सर्व बाबी तपासून लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा