“काँग्रेस महाविकासआघाडीवर नाराज असल्याने सत्तेतून बाहेर पडेल आणि लवकरच भाजपा महाराष्ट्रात सत्तेवर येईल ” असे विधान केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) सातारा येथे केले.
केंद्रीयमंत्री रामदास आठवले मागील दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर होते शनिवारी त्यांनी वाई व महाबळेश्वर येथे भेट दिली. आज(रविवार) ते सातारा येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड अण्णा वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आठवले म्हणाले, “हे सरकार किती दिवस राहील याबाबत आम्ही साशंक आहोत. काँग्रेसला सरकारमध्ये पाहिजे तेवढा सन्मान मिळत नाही, त्यामुळे तो पक्ष महाविकासआघाडी बरोबर किती दिवस राहणार हे सांगता येत नाही. काँग्रेसने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्यास महाविकास आघाडी सरकार पडेल असं देखील त्यांनी बोलून दाखवलं. बाळासाहेब ठाकरे यांना जे मान्य नव्हते तेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पक्षाला वारंवार विरोध केला त्या पक्षासोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मतभिन्नता असलेल्या पक्षांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळत आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या कारभारावर काँग्रेस देखील नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने जर सरकारचा पाठिंबा काढला तर महाविकास आघाडीचे सरकार पडू शकते ” असे आठवले म्हणाले.
तसेच, “भाजपाच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार आहेत. भाजपाला सत्तेवर येण्यासाठी २८ आमदारांची गरज आहे . निवडणूक टाळण्यासाठी राज्यातील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल.” असे रामदास आठवले यांनी सांगितले.