सांगली : कॉंग्रेस सध्या चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत असून लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगले यश मिळवेल असा आशावाद माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारीसाठी पक्ष निरीक्षकासमवेत आज बैठक झाली या बैठकीनंतर आ. कदम यांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात काँग्रेसला अनुकूल स्थिती आहे.
सत्तेची हवस असलेल्यांना बाजूला ठेवण्याची सामान्य लोकांची मानसिकता झाली आहे. मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराबद्दल सरकखर बोलत नाही. हे कुणाला पटलेले नाही. काँग्रेस पुन्हा एकदा चा़गले यश मिळवेल अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी आमदारांना कमी निधी देण्याचा पायंडा पाडला जात आहे. हे लोकशाहीला शोभणारे नाही. राज्य सरकारने निधी वाटपात दुजाभाव केला असून अशी राज्याची संस्कृती नाही. विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधीही राज्यातील जनतेचे प्रतिनिधीत्व करतात. त्या मतदार संघातील जनतेचेही राज्याच्या विकासात योगदान आहे सर्वांना समान निधी मिळायला हवी अशी आमची मागणी आहे असेही त्यांनी सांगितले.