सांंगली : सांगलीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचा संयुक्त निर्णय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार असून अजूनही ही जागा काँग्रेसलाच मिळेल असा विश्वास आपणास वाटत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले. यामुळे सांगलीतील लढतीबाबतचे गूढ अजून दोन दिवस कायम राहणार आहे.
सांगलीसाठी मविआमधील शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केली असून यामुळे उमेदवारीबाबत संशय निर्माण झाला आहे. आमचे नेते डॉ. विश्वजित कदम सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी प्रयत्नशील असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगली दौर्यावेळी डों. विश्वजित कदम यांच्याबाबत पायलट गुजरातच्या दिशेला जाते की काय अशी केलेली टिप्पणी चुकीची असून या वक्तव्याचा काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही निषेध करतो. डॉ. कदम यांच्याबाबत संशयाची स्थिती आणि तीही मित्रपक्षाच्या मातब्बर नेत्याने निर्माण करणे दुर्दैवी असून आघाडीमध्ये त्यांची जशी आम्हाला गरज भासणार आहे तशीच गरज आमचीही त्यांना भासणार आहे.
सांगली म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असून याठिकाणी १६ वेळा काँग्रेसकडेच प्रतिनिधित्व आहे. राज्यात केवळ नंदुरबार आणि सांगली या दोनच जागांवर सातत्याने काँग्रेसचे उमेदवार विजयी होत आले आहेत. अशा ठिकाणी सर्वांनीच गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसला अनुकूल स्थिती निर्माण केली असून यामुळे भाजपचा याठिकाणी पराभव होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा ठिकाणीच ठाकरे शिवसेनेने जागा मागणी करणे अनाकलनीय वाटते. यामागे कोणाचे षढयंत्र आहे का काय हे आताच समजणार नसले तरी नजीकच्या काळात यावरचा पडदा दूर होईलच यात शंका नाही.
हेही वाचा – कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसने डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली मतदारांमध्ये जागृती केली आहे. अगोदरच काँग्रेसला पोषक स्थिती असताना खासदार संजय राऊत भाजपविरोधी वक्तव्य करण्याऐवजी मित्रपक्षाच्या नेत्यांबाबत संशयाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते घातक ठरणारे आहे.
मविआची संयुक्त पत्रकार बैठक उद्या होणार असून या बेठकीतच मविआच्या उमेदवारांची नावे जाहीर करून ती नावे अधिकृत असतील. या यादीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसला मिळाल्याचे दिसेल, असा आमचा ठाम विश्वास आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – …तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न
दरम्यान, यदाकदाचित मविआमधून उमेदवारी काँग्रेसला मिळालीच नाही तर काय भूमिका असणार याबाबत वारंवार विचारले असता थेट उत्तर देण्याचे काँग्रेस नेत्यांनी टाळले असले तरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सावंत यांनी यदाकदाचित तशी स्थिती निर्माण झालीच तर वरिष्ठांच्या आदेशाने पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगत अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णयही होऊ शकतो असे सूचित केले.
भाजपचे कवच बाजूला ठेऊन खासदार पाटलांनी मैदानात यावे – विशाल पाटील
दोन दोन पैलवानांसोबत कुस्ती करण्याची भाषा करणार्या खासदार संजयकाका पाटील यांनी पक्षाचे कवच बाजूला ठेवून मैदानात उतरावे, मी त्यांच्याशी लढत करायला तयार आहे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिले.
गेल्या दहा वर्षांत भाजपच्या खासदारांनी केवळ फसवणुकीचा उद्योग केला असून सामान्य मतदार त्यांच्यापासून दुरावला आहे. तरीही भाजपचे चिलखत वापरून आखाड्यात उतरण्याचे आव्हान ते देत आहेत. मात्र, कुस्तीच्या आखाड्यात भाजपचे संरक्षण कवच बाजूला ठेवून चड्डीवर त्यांनी मैदानात यावे, मीही लढतीसाठी लंगोट घालून तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.