काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल सलग तिसऱ्या दिवशीही ईडी कडून चौकशी करण्यात आली. तर, ईडी कडून राहुल गांधींच्या सुरू झालेल्या कारवाईमुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसकडूनही आज राजभवनासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. शिवाय, उद्या राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे.
“राहुल गांधीनी सातत्याने जनत्तेचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या पाया खालची वाळू सरकून त्यांनी भेकड कारवाई केली. भाजपाच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष आज राजभवनाजवळ आंदोलन करणार आहे. यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने यावे ही नम्र विनंती.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक – नाना पटोले
नाना पटोले ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे म्हणतात की, “माझं सगळ्या काँग्रेसच्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सर्वसामान्य लोकांना देखील आवाहन आहे की, ज्या पद्धतीने देशात हुकूमशाहीची सुरुवात झालेली आहे. ज्या लोकांनी मागील आठ वर्षात देश विकण्याचं काम केलं. देशाच्या सगळ्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचं काम केलं. करोनाच्या काळात जी लस देशामध्ये निर्माण झाली, ती देशाच्या लोकांना अगोदर देण्याची गरज होती. पण त्यावेळी आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तानला लस मोफत देण्याचं काम ज्या केंद्रातील भाजपा सरकारने केलं. यामुळे लोकांना करोनाच्या संकटात मृत्यूशी झूंज देताना आपण पाहिलेलं आहे. या देशाचं जसं विभाजन झालं, तसं करोना कालखंडात लाखो-करोडो लोकांचं पलायन झाल्याचं पाहायला मिळालं, अशा पद्धतीची परिस्थिती या नरेंद्र मोदींच्या सरकारने निर्माण केली. या सरकारच्या विरोधात आमचे नेते राहुल गांधी सातत्याने लढा देत असतात, जनतेची भूमिका पोटतिडकीने केंद्र सरकारच्या विरोधात मांडतात. परंतु आज राजकीय द्वेषापोटी आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने, खोटे आरोप करून गांधी परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपाने जे रचलेलं आहे. या षडयंत्राला संपवण्यासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन, केंद्रातील नरेंद्र मोदींच्या अत्याचारी सरकारविरोधात हा लढा आपल्या सगळ्यांना उभारायचा आहे.”
तसेच, “या पार्श्वभूमीवर आज राजभवनावर आपलं आंदोलन आहे. घेराव करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. वेळ आली तर जेल भरो करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. उद्या आपण राज्यभारतील कानाकोपऱ्यात हे आंदोलन उभा करत आहोत. म्हणून मोठ्यासंख्येन सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं, अशी मी विनंती करतोय.” असं आवाहन नाना पटोलेंनी केलं आहे.